जेट्टी, बंदरे, बोटी आणि मच्छी व्यवसायातील घुसखोर शोधून काढा, मंत्री नितेश राणे यांचे आदेश

गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग तसेच गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा फेरी कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध बांगलादेशी नागरिक काम करीत असल्याची माहिती असल्याने हा परिसर संवेदनशील आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा पोलीस महानिरीक्षक तसेच कोकण विभाग पोलीस महानिरीक्षक आणि महाराष्ट्र सागरी मंडळाने संशयित सर्वांची चौकशी आणि तपासणी करावी असे आदेश मंत्री नितेश राण यांनी यावेळी दिले आहेत.

कश्मीर पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सागरी मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रकल्पात तसेच बंदरे, जेट्टी आणि मत्स्य व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जागांमध्ये काम करणारे कामगार तसेच या जागेत वावर असणाऱ्या सर्व व्यक्तींची सागरी सुरक्षा दलाने आणि महाराष्ट्र पोलिसांनी कसून चौकशी करावी असे आदेश राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. सागरी सुरक्षेबाबत बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी हे निर्देश दिले.

काश्मीर पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सागरी सुरक्षेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. महाराष्ट्राला विस्तीर्ण असा 720 किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. त्यावरील सर्व बंदरे, मच्छ व्यवसाय प्रकल्पावर सुरक्षा संदर्भात पावले उचलावीत असे आदेश वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना मंत्री नितेश राणे यांनी दिले. कश्मीर येथील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सागरी सुरक्षा पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाने कोणत्या प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या याचा आढावा घेतला गेला.

ससून डॉक क्षेत्रामध्ये झाडाझडती

सागरी सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक आणि सजग राहण्यासाठी सर्च ऑपरेशन,कोंबिंग ऑपरेशन राबवून कामगारांच्या ओळखपत्रांची तपासणी,आधार कार्डची तपासणी आदी चौकशी करण्याची सूचना देखील मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिली. यामध्ये विशेषतः ससून डॉक क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी, बोट चालक, फेरीवाले तसेच तिथे काम करणाऱ्या सर्व व्यक्तींची चौकशी आणि तपासणी करण्याचे आदेशही यावेळी नितेश राणे यांनी दिले.

बंदरे आणि समुद्र किनारपट्टीवर काम करणाऱ्या सर्व कामगारांना पोलीस पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्याची सूचना देखील मंत्र्यांनी यावेळी केली. सर्व कामगारांनी ओळखपत्र बाळगावे सर्व व्यक्तींची चौकशी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नोटीसा पाठवाव्यात असेही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. सागरी सुरक्षा बाबत आढावा बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्रणालीद्वारे आयोजित केली होती.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)