जयंत पाटलांचा ‘तो’ प्रश्न, फडणवीसांचं उत्तर; नितेश राणेंना नेमका काय दिला सल्ला?

आज एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल फडणवीस यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना संयम  बाळगण्याचा सल्ला दिला आहे. ‘तुम्ही मंत्री आहात तुम्ही संयम बाळगूनच या ठिकाणी बोललं पाहिजे’ असं फडणीस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?  

मंत्री म्हणून आपली एक भूमिका आहे, ज्याचा उल्लेख आदरणीय अटल बिहारी वाजपेयींनी केला होता. मंत्री म्हणून आपल्याला राज धर्म पाळायचा असतो. त्यामुळे आपले विचार काय आहेत, आपल्याला काय आवडतं? काय आवडत नाही? हे बाजूला ठेवून आपण संविधानाची शपथ घेतली आहे. संविधानाने आपल्यावर कोणासोबतही अन्याय न करता वागण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाळला पाहिजे. आपल्या बोलण्यातून कुठेही तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. कधी-कधी तरुण मंत्री बोलून जातात. त्यांच्याशी मी संवाद करतो, त्यांना मी सांगतो. की आता तुम्ही मंत्री आहात तुम्ही संयम बाळगूनच या ठिकाणी बोललं पाहिजे. असं उत्तर यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्या प्रश्नाला दिलं आहे. ते लोकमतने आयोजित केलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

दरम्यान त्यापूर्वी नागपूर राड्यावरून विधानसभेत बोलताना फडणवीस यांनी कडक इशारा दिला आहे. ज्या चादरीवरून हा वाद झाला त्या चादरीवर पवित्र कुरानाची कोणतीही आयत नव्हती. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांना माफी नाही, पोलिसांवर हल्ला करणारे जर कबरीत लपले असतील तर आम्ही त्यांना कबरीतून शोधून काढू, असा इशारा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.  नागपूर पूर्वीपासून शांत आहे, 1992 ला साप्रदायिक तणाव निर्माण झाला त्यावेळी देखील नागपूर शांतच होतं. मात्र यावेळी काही जणांनी जाणीवपूर्वक चुकीचे मेसेज व्हायरल केले, त्यामुळे हे सर्व घडलं, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)