Jayant Patil : टॅरिफचा कहर; ‘शेअर मार्केट पडले, पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले’

| Updated: 7 Apr 2025, 10:37 pm

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवल्याने आणि गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. यावरून जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी या दरवाढीमुळे महागाईने त्रस्त जनतेला सरकार लुटीचे ‘गिफ्ट’ देत असल्याची टीका केली आहे.

सांगली : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी वाढवली तसेच गॅस सिलिंडरचे दरही वाढवले. यामुळे महागाई वाढून सामान्य जनतेच्या खिशाला मोठा भूर्दंड पडला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरुन सरकारवर निशाणा साधला आहे.

“आज सकाळीच शेअर मार्केट गडगडले आणि सामान्य मध्यमवर्गीय माणसाला त्याचा धक्का बसला. या धक्क्यातून सावरत नाही तोच आज केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर २ रुपये एक्साईज ड्युटी वाढवली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलही महाग होणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीतही ५० रुपयांची वाढ झाली आहे. उद्यापासून नवीन किमती लागू होणार आहे. सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणांचे ओझे सामान्य माणसाला हाकावी लागत आहे. त्यात सामान्य माणसाचे कंबरडे मोडले जात आहे”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

‘एकाच दिवशी 26 लाख कोटींचा फटका’

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील सरकारवर निशाणा साधला आहे. “मी 2 तारखेला सोशल मीडियावर व्यक्त झालेलो. तसेच मी अनेक दिवसांपासून बोलतोय. 2 एप्रिलला टॅरिफ बदलणार असल्याचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं होतं. खरं म्हणजे जेव्हा आपल्या देशाच्या संसदेच अधिवेशन सुरु होतं तेव्हा वित्तमंत्र्यांनी किंवा पंतप्रधानांनी टॅरिफचे आपल्या देशावर काय परिणाम होतील हे बोलणं आवश्यक होतं”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी पक्ष असतील, सर्वांना एकत्र आणून आपल्या देशापुढे चॅलेंज आहे हे सांगणं आवश्यक होतं. पण हे चॅलेंज दिसल्यानंतर भाजपला त्यांचं प्लेबुक आठवलं हिंदू-मुस्लिम, हे त्याच्यात घुसले. आज आपण पाहतोय. आजच्या दिवशी 26 लाख कोटींचा फटका बसला आहे. किती कंपन्या बंद होणार आहेत. किती लोकांचा रोजगार जाणार याचा अंदाज तरी वित्तमंत्र्यांना आहे का? या सरकारने अंदाज घेतला आहे का? याचा विचार करा. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि टॅरिफमुळे देशाची आर्थिक पडझड होणार आहे. मग देशात दंगली निर्माण करायच्या एवढंच चालणार आहे. मनापासून हीच इच्छा आहे”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

‘महागाईने त्रस्त जनतेला सरकार लुटीचं…’, राहुल गांधींचा निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅरिफला जोरदार उत्तर दिलं. पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स आणि गॅस सिलेंडचे दर आणखी वाढवले. महागाईने त्रस्त जनतेला सरकार लुटीचं आणखी एक गिफ्ट दिलं”, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)