पक्षाच्या पिंपरी-चिंचवड विभागातर्फे पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर विजयी संकल्प मेळावा आयोजित केला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात पाटील यांनी राज्य सरकार भ्रष्टाचाराची बजबजपुरी असल्याचा आरोप करून अनेक कामांची यादी वाचून दाखविली. त्यामध्ये पुण्यातील रिंग रोडच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाचाही समावेश होता.
पाटील म्हणाले, ‘सुमारे १३६ किलोमीटर लांबीचा रिंग रोड पुण्यात होत आहे. या कामासाठी १६ हजार ६१८ कोटी रुपये खर्चाच्या कामाची निविदा तयार करण्यात आली. त्यापेक्षा एकदोन टक्क्यांनी कमी अथवा जास्त दराने ठेकेदाराला काम देणे अपेक्षित होते. मात्र, यासाठी २२ हजार ७९९ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देऊन मेघा इंजिनीअरिंग, नवयुग इंजिनीअरिंग, रोडवे सोल्युशन्स आणि जीआर इन्फो यांना काम देण्याचा निर्णय सरकारने घेतला. जवळपास ३० ते ४५.७२ टक्के जादा दराने काम दिले. कारण, याच कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला निवडणूक रोखे दिले आहेत.’ ठेकेदारांकडून भ्रष्टाचार करून घ्यायचा आणि त्याची वसुली टोलच्या माध्यमातून नागरिकांकडून करायची, असा सरकारचा अजब कारभार चालू असल्याचा आरोपही पाटील यांनी या वेळी केला. ‘तुरुंगापेक्षा भाजप बरा’ असे म्हणून सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांची चौकशी का बंद झाली? हे जनतेला माहित आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशावरही शिक्कामोर्तब झाले. या वेळी सर्वांचे स्वागत करण्यात आले.
खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, संयोजक सुलक्षणा शिलवंत-धर यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर खासदार बजरंग सोनवणे, माजी खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केले.
‘विकासात उद्योगांचा मोठा वाटा’
‘पिंपरी-चिंचवड परिसरात औद्योगिक नगरी निर्माण होण्यामध्ये टाटा मोटर्स, बजाज आणि हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपन्यांची भूमिका मोठी राहिली आहे,’ असे नमूद करून शरद पवार यांनी लहान गावे मिळून तयार झालेल्या या शहराचा झपाट्याने विकास होण्यामध्ये उद्योगांचा मोलाचा वाटा असल्याचे स्पष्ट केले.
‘८५ आमदारांचे ध्येय’
‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा डिसेंबर महिन्यात ८५वा वाढदिवस आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे ८५ आमदार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत ८५ नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय ठेवूयात,’ असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले. शहरातील तिन्ही विधानसभा क्षेत्रांत महाविकास आघाडीला विजयी करण्याचा संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने करूयात, असे आवाहनही त्यांनी केले.