पहिल्या टप्प्यात राज्यात या संस्थांमधून जन औषधी केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. मंत्रालयाने संबंधित संस्थांची कागदपत्रे तपासल्यानंतर त्यांना जनऔषधी केंद्र सुरू करण्यासाठी कोड देण्यात येतो. त्यानंतर औषधी परवाना देऊन दुकान सुरू करता येते. त्यानुसार आतापर्यंत २९० संस्थांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात २५० संस्थांनी नोंदणी केली असून, आयुष मंत्रालयाने १८६ संस्थांना मान्यता दिली आहे.
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तांच्या (एफडीए) निकषांनुसार या जनऔषधी केंद्रांमध्ये फार्मासिस्टची उपस्थिती बंधनकारक आहे. त्यामुळे १२३ संस्थांनी अशा फार्मासिस्टची नेमणूक केली आहे; तर औषध परवान्यासाठी १०३ संस्थांनी अर्ज केला आहे. आतापर्यंत ५० संस्थांना औषध परवाना मिळाला आहे; तर २७ ठिकाणी जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आले आहे. गावातच स्वस्त व किफायतशीर दरामध्ये औषधे मिळावीत, हा यामागील उद्देश आहे; तसेच यातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून संस्थांचे बळकटीकरणदेखील होणार आहे.
राज्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहे. त्यामुळे तीनशे प्रकारचे उपक्रम या संस्थांना राबविणे शक्य आहे. त्याद्वारे संस्थांना आर्थिक उत्पन्न मिळू शकणार आहे.
– शैलेश कोतमिरे, प्रभारी आयुक्त, सहकार विभाग