मुंबईतील विलेपार्ले भागातील जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी पाडलं. मुंबई पालिकेच्या या कारवाईनंतर देशभरातील जैन समुदाय संतप्त झाला आहे. मुंबई मनपाच्या कारवाईविरोधात जैन समाजाकडून शनिवारी अहिंसक रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाले. स्थानिक खासदार आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड सुद्धा या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. TV9 मराठीशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड यांनी सरकारला फैलावर घेतलं.
“त्यांची मागणी काय आहे? ज्या अधिकाऱ्याने कारवाई केली, त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी. ही मागणी योग्य आहे. सकाळी दोन जेसीबी आणले, महिलांवर हल्ला झाला. याचा सगळेजण निषेध करतायत. जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे. आजपर्यंत त्यांचा कधी आवाज ऐकला होता का? आज का उतरावं लागलं त्यांना?” असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी विचारला.
‘तेच मला आश्चर्य वाटतं’
“ज्या तऱ्हेने तुम्ही कारवाई करत चालला आहात, बेकायदा गोष्टींना समर्थन देता आणि कायदेशीर गोष्टींवर कारवाई करता. म्हणून त्यांना रुद्रावतारावर यावं लागलं. डबल इंजिन सरकारसाठी हा आवाज आहे. राजस्थान, मुंबईत जैन समाजाचे मोर्चे निघत आहेत” असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. सत्ताधारी पक्षाचे आमदार, मंत्री या रॅलीत सहभागी झाले आहेत, त्यावर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “तेच मला आश्चर्य वाटतं. सत्ताधारी पक्षाचे आमदार, मंत्री रॅलीत सामील होतात. त्यांचच सरकार आहे”
“श्रद्धा स्थानं संभाळणं त्यांचं काम आहे. ते होताना दिसत नाही. मूळात ही कारवाई पूर्वनियोजित होती. हे षडयंत्र आहे. या षडयंत्राविरोधात शांतताप्रिय जैन समजाला रस्त्यावर उतरावं लागलं आहे” असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.