महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणारं हे सरकार आहे का?, उद्धव ठाकरे कडाडले

भारतीय कामगार सेनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. या सभेत शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या मराठी-अमराठी वादावर थेटपणे भाष्य केले. मराठी भाषाची गळचेपी करणाऱ्यांचे हे पाय चाटत आहेत. हे कसले बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार आहेत. महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेतलेले सत्ताधारी दुर्देवाने महाराष्ट्राला लाभले का? असे रोखठोक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारले.

सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता सांगितले, हे सरकार आल्यावर मराठी नही आती. मराठी लोक गंदे है, वह नॉनव्हेज खाते है, अशी वक्तव्य समोर येऊ लागली. जसे आपण म्हटले होते ना इस देश में रहना होगा तो वंदे मातरम बोलना होगा, तसे आता म्हणावे लागले इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलना होगा.

हिंदुत्वावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आमचे हिंदुत्व अस्सल धर्म पाळणारे आहे. मराठी भाषा पाळणारे आहे. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. तामिळनाडूत स्टॅलिन बसले आहे. तिकडे हिंदी सक्तीबद्दल बोलून तर दाखवा. आमचे हिंदीसोबत काही वैर नाही. सर्व जण हिंदी बोलतात. मग तुम्ही सक्ती का करतात. तुम्ही हिंदीची सक्ती करत असाल, होऊ देणार नाही. सर्व दुकानावर पाट्या मराठीत लिहिण्याचा आम्ही कायदा केला होता. या सरकारने त्याची किती अंमलबजावणी केली. काही नतद्रष्ट कोर्टात गेले. अरे या ठिकाणी राहतात, येथील मीठ खातात आणि मराठीला विरोध करतात? आपले सरकार असताना कुणाची हिंमत नव्हती. आपले सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर त्यांच्या पालख्या वाहत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

घाटकोपरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत मराठी नाही आली तर चालते, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीसजी तुमचे जोशी तिथे बोलले तिथे आधी मराठी सक्तीची करून दाखवा. घाटकोपरमध्ये मराठी आलीच पाहिजे. मग आम्ही हिंदीचे काय करायचे ते पाहून घेऊ. पण मुंबईत मराठी आली पाहिजे. प्रत्येक माणूस तिथे मराठी बोललाच पाहिजे. आम्ही कुणाचा दुस्वास करत नाही. आमच्याकडे शिवसैनिक उत्तर भारतीय आहेत. मुस्लिम आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)