पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेस व डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या २८ ते ३० जूनदरम्यान बंद राहणार आहेत. पुणतांबा-कानेगाव आणि दौंड-मनमाड विभागांत सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे या दोन एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस येत्या शुक्रवारी (दि. २८) रद्द करण्यात आली आहे. शनिवारी (दि. २९) मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसदेखील रद्द करण्यात आली असून, त्याच दिवशी ‘पुणे-मुंबई इंटरसिटी’सुद्धा रद्द करण्यात आली आहे. रविवारी (दि. ३०) मुंबई-पुणे इंटरसिटी रद्द केली आहे.
इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस तीन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याने मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या दोन्ही ट्रेनने जलद प्रवास होत असल्यामुळे या ट्रेनना प्रवाशांची नेहमी गर्दी असते. या दिवसांत पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
डिझेल लोको शेडच्या छतावर होणार ९.४४ लाख किलोवॅट वीजनिर्मिती
घोरपडी येथील डिझेल लोको शेडच्या छतावरील साडेसहा हजार चौरस मीटर परिसरात रेल्वे विभागाने सौर पॅनल बसवून वीज निर्मिती सुरू केली आहे. डिझेल लोको शेडवरील सौरपॅनलमुळे वर्षाला ९.४४ लाख किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. रेल्वेचे वर्षाला ५२ लाख रूपयांचे वीज बिलात बचत होणार आहे.
घोरपडी येथे रेल्वेचे डिझेल लोको शेड आहे. या ठिकाणी बसविण्यात आलेले ६४७ किलोवॅट क्षमतेची बसविण्यात आलेल्या सौरपॅनलचे उद्घाटन मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यादव यांनी शनिवारी केले. यावेळी त्यांनी डिझेल लोकोशेडची फिरून पाहणी देखील केली. यावेळी पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इंदु दुबे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
घोरपडी येथील डिझेल लोको शेडच्या छतावरील साडेसहा हजार चौरस मीटर परिसरात एकूण ११८८ सौरपॅनल बसवण्यात आले आहेत. या पॅनल्सद्वारे वर्षाला अंदाजे ९.४४ लाख किलोवॅट वीज तयार केली जाईल. डिझेल लोको शेडचा वार्षिक वीज वापर ९.४६ लाख किलोवॅट आहे. परिणामी ५२ लाख रुपयांच्या वीज बिलाची बचत होणार आहे. तसेच, कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन अठरा हजार १२२ टन प्रतिवर्ष कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पुणे-लोणावळा मार्गाची पाहणी
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी शनिवारी पुणे विभागातील लोणावळा-पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाची पाहणी केली. महाव्यवस्थापकांनी तपासणी कोचच्या विंडो द्वारे लोणावळा-पुणे डाऊन आणि अप मार्गावरील रेल्वे मार्ग, विद्युत ओव्हरहेड उपकरणे (ओएचई), पुलांची स्थिती, सिग्नल यंत्रणा यासह सर्व तांत्रिक बाबींचे निरीक्षण केले. महाव्यवस्थापकांनी सर्व अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या सुरक्षेकडे व प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांकडे विशेष लक्ष देण्याबाबत सूचना दिल्या.