Indian Railway: प्रवाशांच्या तक्रार निवारणास प्राधान्य हवे; वैष्णव यांच्या रेल्वे महाव्यवस्थापकांना सूचना

मुंबई : भारतीय रेल्वेवर धावणाऱ्या प्रत्येक रेल्वे आणि रेल्वेगाडीतील प्रत्येक प्रवासी महत्त्वाचा आहे. यांमुळे रेल्वे मदद अॅपवरील येणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारींचा वेगाने निपटारा करा. पावसाळ्यात रेल्वे वाहतूक अविरत सुरू राहण्यासाठी अधिक जागरूकता दाखवा, अशा सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांना दिल्या आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव मुंबई दौऱ्यावर असताना मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या पावसाळी कामांच्या तयारीचा आढावा शुक्रवारी रात्री उशिरा घेतला. रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असलेल्या आढावा बैठकीत मध्य-पश्चिम रेल्वेवरील स्वच्छता आणि नालेसफाईच्या नाविन्यपूर्ण उपक्रम देशातील सर्व रेल्वेमध्ये आवश्यकतेनुसार वापरा, अशा सूचना ही मंत्री वैष्णव यांनी रेल्वे यंत्रणेला दिल्या आहेत.

‘रेल्वे मदद पोर्टलवरून प्रवाशांना प्रत्यक्ष वेळेत (रिअल टाइम) ऑनलाइन फोटो आणि व्हिडीओसह तक्रार करण्याची मुभा आहे. तक्रारी सोडवण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये वॉर रूम तयार केले आहे. यातून प्रवाशांच्या तक्रारींचा निपटारा वेगाने होत आहे. अनेकदा रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांतील गर्दीचे व्हिडीओ, पाणी साचलेल्या ठिकाणांचे जुने फोटो वारंवार व्हायरल होत असल्याचे दिसून आले. अशा तक्रारींवर योग्य माहिती देऊन प्रवाशांना समाधानकारक प्रतिसाद द्यावा’, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य रेल्वे मुंबईचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीशकुमार गोयल आणि पश्चिम रेल्वेच्या नीरज वर्मा यांनी माध्यमांशी शनिवारी संयुक्त संवाद साधला. पावसाळी तयारीच्या कामांची माहिती त्यांनी दिली.

‘पश्चिम रेल्वेने पाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेजमधील अडथळे शोधण्यासाठी तरंगते एलईडी दिव्यांचे रिमोट कंट्रोल संचलित कॅमेऱ्यांची बोटसदृश्य यंत्रणा विकसित केली. मध्य रेल्वेने साचणाऱ्या पाण्यातही पॉइंट कार्यान्वित राहण्यासाठी विशिष्ट जलरोधक आवरण तयार केले आहे. अशा नाविन्यपूर्ण कल्पनांचे देशातील अन्य रेल्वेमध्ये आवश्यकतेनुसार वापरण्याच्या सूचना रेल्वे मंत्र्यांनी दिल्या आहेत’, असे मध्य रेल्वेचे डीआरएम गोयल यांनी सांगितले.

‘मध्य आणि पश्चिम रेल्वेने कचरा वेचण्यासाठी लोकलगाड्यांमध्ये बदल करून विशेष लोकल तयार केली आहे. त्याचबरोबर पावसाळी कामांमध्ये नाल्याची सफाई करणे, कल्व्हर्ट स्वच्छता, पाणी उपसा करणारे पंप बसविणे अशी कामे मध्य आणि पश्चिम रेल्वेने पूर्ण केली आहेत’, अशी माहिती सादरीकरणात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला आणि पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.

घाटमार्गावर जाळ्यांची व्यवस्था

कसारा आणि लोणावळा घाटमार्गात कोसळणाऱ्या दरडी रोखण्यासाठी विविध प्रकारच्या जाळी उभारण्यात आल्या आहेत. घाटात प्रशिक्षित हिल गँगची नियुक्ती केली असून त्यांच्याकडून २४ तास गस्त सुरू आहे.

बोल्डर नेटिंग – ६०,००० चौ.मी.
कॅनेडिअन फेन्सिंग – ४५० मी.
घाटातील नाले सफाई -१२०० मी.
डायनॅमिक बॅरिअर- ६५० मी.