Indapur Assembly : कोण होणार इंदापूरचा आमदार? विधानसभेपूर्वीच रंगलं बॅनर वॉर

इंदापूर : इंदापूर तालुक्यात एकापाठोपाठ एक जण आमदार होण्याची स्वप्नं रंगवत आहेत. दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील अपक्ष उभं राहणार की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यातच आता प्रदीप गारटकरांनी देखील चंग बांधला आहे. इंदापूरचा आमदार कोण होणार यावर आता बॅनर वॉर रंगला आहे.

प्रदीप गारटकर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. गारटकरांच्या समर्थक आणि नगरसेवकांनी त्यांचा ‘आमदार साहेब’ नावाचा फलक उभा केल्याने सगळीकडे याची जोरदार चर्चा सुरू आहे. इंदापूर तालुक्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आजी-माजी आमदार असून देखील पिछाडीवर राहावे लागले. यावर आत्मपरीक्षण करणं तर बाजूलाच राहिलं पण आता आमदार आपलाच, असे म्हणत सर्वांचे कार्यकर्ते आता पुढे सरसावले आहेत.
Eknath Shinde: आधी ठाकरेंना धक्का, आता भाजपला दणका? शिंदेंकडून डाव टाकण्यास सुरुवात, बालेकिल्ला परत मिळवणार?
दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलांचा उल्लेख न करता मात्र जुन्या चिन्हाचा उल्लेख करत आता तयारीला लागायचं आणि विमान हातात घ्यायचं, अशा स्वरूपाचा एक फलक उभा केला होता. त्यावरून चर्चेला सुरुवात झाली. मात्र त्यानंतर थांबतील तर भरणे मामांचे कार्यकर्ते कसले. भरणे मामांचे कार्यकर्ते देखील जोरात कामाला लागले. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी फलक आणला आणि तो उभा केला. त्या फलकावर आशय होता की, ‘आमचं ठरत नसतंय, आमचं फिक्सच असतंय’ अशा शब्दांत त्यांनी हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांना खुन्नस दिली.
MLC Election 2024: विधान परिषद निवडणुकीत कोणाचा गेम? क्रॉस व्होटिंगचा धोका, ‘त्या’ तिघांची नाराजी महागात पडणार?
हे कमी की काय म्हणून शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या समर्थकांनी ‘इथं साहेब सांगतील तोच आमदार होतो’ असं सांगत या बॅनर वॉर मध्ये उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन आमदारांमध्ये कार्यकर्त्यांनी स्पर्धा लावून टाकली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा आज फलक उभा करत ‘आमदार साहेब’ अशी त्यांना उपमा देखील देऊन टाकली. एकंदरितच इंदापूर तालुक्यात मिळालेल्या कमी मताधिक्याचे कोणाला सोयर सुतक नाही. तर चक्क चढाओढ सुरु आहे. सामान्य नागरिकांमध्ये मात्र आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशा प्रकारची भावना निर्माण झाली आहे. आणि हे फ्लेक्स फलक पाहून सारे जण हसत आहेत.