मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित केला होता. बँक आणि इतर अस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो की नाही हे जाऊन तपासा असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर एका बँक कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना देखील समोर आली होती. यावरून हे प्रकरण चांगलंच तापलं. यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले सदावर्ते?
व्यवसाय करताना कोणालाही सक्ती करता येऊ शकत नाही, राईट टू स्पीच ॲंड एक्सप्रेशन समजून घ्यावं, भाषावार प्रांतरचना करताना हे सांगितलं होतं. महाराष्ट्राचे चार भाग व्हावेत असं बाबासाहेबांना वाटत होतं. आजही आम्ही वेगळा विदर्भ मागत आहोत. राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर धुरळा उडवण्याचा प्रयत्न केला होता, गल्लीगल्लीमध्ये राज ठाकरेंच्या पक्षासारख्या पार्ट्या आहेत. पोलिसांची देखील आज बैठक होती, संविधानाला तडा जाऊ नये, राज ठाकरे यांनी अभ्यास करावा. केवळ राजकारण करण्यासाठी आपण हे करत आहात, मराठीच्या नावाखाली काय डील झाली हे सांगा? असा हल्लाबोल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
केबल वायरचा संबंध आहे का? रत्नागिरीत मोठी कंपनी येत आहे त्याचा संबंध आहे का? हिंदुस्थान मजदूर संघामार्फत आम्ही गोरगरीबांना सन्मानित करणार होतो. राज ठाकरे संसदेतील आकड्यांसंदर्भात देखील झिरो आहेत, उदय सामंत यांची एक ख्याती आहे, त्यांच्या हातात भरभरून लक्ष्मी असते, कोणी सुद्धा प्रसन्न होईल, राज ठाकरे प्रसन्न झाले ना? माझे पण आवडीचे आहेत ते, आमची देखील त्यांच्याशी मन की बात होते. राज ठाकरे पेटवून देतात, आणि नंतर घरातून निर्णय घेतात. त्यांच्या मुलाने बॅंकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली का? का नाही दिली परवानगी राज ठाकरेंनी? कारण माहिती आहे जेलमध्ये जावं लागतं, असा टोला यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला आहे.