महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? राज्यात आणखी एक आघाडी, विरोधी पक्षाची कमतरता दूर करण्यासाठी तीन बडे नेते एकत्र

राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर

महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील बंडखोरीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मोठा फटका बसला. तिन्ही पक्षांना मिळूनही ५० आमदारांचे संख्याबळ गाठता आले नाही. राज्यात सत्ताधारी पक्षाविरोधात विरोधकांची धार कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील तीन बड्या नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्या तिघांनी त्यासाठी पुण्यात येत्या रविवारी ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’चे आयोजन केले आहे.

कोणते तीन नेते एकत्र

राज्यात महाविकास आघाडी विरोधात आहे. शिवसेना उबाठा, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडीत आहे. परंतु या तिन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत मोठे संख्याबळ मिळवता आले नाही. त्यामुळे विरोधकांची धार कमी झाली आहे. आता विरोधी पक्षांची स्पेस भरून काढण्याच्या निर्धाराने तीन बडे नेते एकत्र येणारे आहेत. राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर यांची एकत्रित आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान निर्माण करणार आहे.

युवा संघर्ष निर्धार परिषदचे आयोजन

राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर यांच्या एकत्रित आघाडीचा पुण्यात मेळावा होणार आहे. येत्या रविवारी ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ होणार आहे. त्यात सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग ही आघाडी फुंकणार आहे. त्याची चुणूक त्या आघाडीच्या टॅगलाईनमधून दिसून आली. या परिषदेत सत्ताधाऱ्यांना तिन्ही नेते घेरण्याचा प्रयत्न करणार आहे.

खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार.! या टॅगलाईन खाली “युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५” चे आयोजन राज्यात करण्यात आले आहे. राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ही आघाडी सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे करणार का? हे येत्या काळातच दिसून येणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)