संजय राऊत, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: टीव्ही ९ मराठी
राज्याच्या राजकारणात वाल्मिक कराड, धनुभाऊ, घोटाळ्यांची चर्चा, महाकुंभातील स्नान यावर कोण गहन चर्चा सुरू आहे. महाकुंभात न गेलेले हिंदू कसे अशा वाटेवरून ही चर्चा आता पार ब्रिटिश आमदनीत पोहचली आहे. ब्रिटिशांनी हिंदुस्थानची केलेली लूट सर्वश्रूत आहे. तोच धागा पकडून खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारावर सडकून टीका केली आहे. महाकुंभावरून सुरु असलेल्या राजकारणावरून राऊतांनी शिंदेंना टोला लगावला. एकनाथ शिंदे यांनी मोहन भागवत यांना ते महाकुंभात का गेले नाही, याची विचारणा का केली नाही, असा सवाल राऊतांनी केला.
दोन वर्षात राज्याची सर्वाधिक लूट
उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांचे जुने सहकारी आणि महायुतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मागील सरकारवर गंभीर आरोप केले. ब्रिटिशांनी 150 वर्षात नाही लुटलं ती लूट दोन वर्षांत शिंदे सरकारच्या काळात झाल्याचा आरोप त्यांनी केला. या काळात अनेक टेंडर काढण्यात आले. त्याची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार करत आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कारभारावरती त्यांनी तोंडसुख घेतले. या काळात राज्याची तिजोरी खाली करण्यात आल्याचा आरोप त्यांनी शिंदे सरकारवर केला. तर मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिम हाती घेतल्याचे कौतुक त्यांनी केले.
शिंदेंनी सरसंघचालकांना सवाल करावा
उद्धव ठाकरे हे प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात गेले नाही. त्यांनी स्नान केले नाही. त्यावरून महायुतीमधील घटक पक्ष, शिंदे सेना त्यांच्यावर टीका करत आहेत. त्यावरून कालपासून राज्यात शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना आमने-सामने आली आहे. तर महाकुंभमध्ये सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा गेले नव्हते. आम्ही मोहन भागवत यांना मानतो. त्यांच्या आदर्शवर चालतो. मग एकनाथ शिंदे यांनी मोहन भागवत यांना ते महाकुंभात का गेले नाही, याची विचारणा का केली नाही, असा सवाल राऊतांनी केला.