पुण्यात वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. सासरच्या छळाला कंटाळून तीने आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासू, सासरा आणि नणंद यांना अटक केली, दरम्यान त्यानंतर आहा हगवणे कुटुंबाचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. असंच एक धक्कादायक प्रकरण आता समोर आलं आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि तिची सासू लता हगवणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
प्रशांत येळवंडे यांनी शशांक हगवणे विरोधात फसवणुकीची तक्रार केली होती, जेसीबी व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. 25 लाख रुपयांमध्ये जेसीबीचा सौदा ठरला, आपण शशांक हगवणे याला सुरुवातीला 5 लाख रुपये, दिले त्यानंतर दर महिन्याला जेसीबीचा हाफ्ता भरण्यासाठी 50 हजार रुपये देत होतो, असं येळवंडे यांनी म्हटलं आहे. मात्र शशांक याने बँकेचा हाफ्ता थकवल्यामुळे हा जेसीबी बँकेने जप्त केला, व तो नंतर शशांक याने सोडवल्याची माहिती समोर आली होती, आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे.
ज्यांनी हा जेसीबी जप्त केला, ते कोणी बँकेचे अधिकारी नसून तोतया होते, असं पोलीस तपासात समोर आलं आहे. आपण बँकेचे अधिकारी असल्याचं भासवत या तिघांनी जबरदस्तीने प्रशांत येळवडे यांच्या ताब्यातील जेसीबी मशीन जप्त केलं होतं. या तिघांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आज पाहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. योगेश राजेंद्र रासकर (वय २५, रा. तळेगाव ढमढेरे), गणेश रमेश पोतले (वय ३०, रा. मोहितेवाडी), वैभव मोहन पिंगळे (वय २७, रा. तळेगाव ढमढेरे) अशी या प्रकरणातील तोतया बँक अधिकाऱ्यांची नावं आहेत.
पोलिसांनी आधी या प्रकरणात संबंधित बँकेकडे चौकशी केली होती, आम्ही जेसीबी जप्त केला नसल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तिघांनी बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी चालकाकडून जेसीबी मशीन अनधिकृतपणे ताब्यात घेतली आणि हा जेसीबी आरोपी शशांक हगवणे याच्या ताब्यात दिला. त्यामुळे पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. या तिघांविरोधात फसवणूक, गैरवर्तन व बनावट ओळख सादर करून अनधिकृत ताबा मिळविल्याचा आरोप आहे.