मुंबईत सोने खरेदी करणाऱ्यांची निराशा, दराने गाठला नवा उच्चांक, प्रतितोळा भाव…

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीचे भाव गगनाला भिडताना दिसत आहेत. त्यातच आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत शहरात सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या मुंबईत सोन्याचा दर प्रतितोळा तब्बल 94,500 रुपयांवर पोहोचला आहे. या दरवाढीमुळे सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहे.

सध्या महागाई सातत्याने वाढत आहे. त्यातच लग्नसराई सुरु आहे. अशाच आता मुंबईतील सोने खरेदीदारांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम मुंबईतील सराफा बाजारावर दिसून येत आहे. जागतिक बाजारात अस्थिरता असल्याने गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे.

लहान-मोठ्या सराफा व्यावसायिकांसाठी चिंतेची बाब

विशेष म्हणजे, सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे सोने खरेदी करत आहेत. मात्र, सोन्याच्या भावात झालेली ही उच्चांकी वाढ त्यांच्यासाठी मोठी अडचण ठरत आहे. अनेक जण वाढलेल्या भावामुळे सोने खरेदीचा विचार पुढे ढकलण्याची शक्यता आहे. सोन्याच्या भावात झालेली ही वाढ केवळ खरेदी करणाऱ्यांना नव्हे तर लहान-मोठ्या सराफा व्यावसायिकांसाठीही चिंतेची बाब ठरत आहे. सोन्याचा भाव वाढल्यामुळे सोन्याची मागणी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या बाजारात काय बदल घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सोन्याच्या दराने गाठला विक्रमी उच्चांक

दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे आगामी काळात लवकरच सोन्याचे दर 1 लाखांपर्यंत जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जळगावच्या सराफा व्यावसायिकांनी ही शक्यता वर्तवली आहे. सध्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. जळगावात सध्या सोन्याचा दर 97 हजार 700 रुपये इतका झाला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)