महाराष्ट्राला पावसाचा तडाखा, भिगवणमध्ये मुसळधार पाऊस, बारामतीत कालवा फुटला

मोठी बातमी समोर येत आहे, महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे. इंदापूर – पुणे-सोलापूर महामार्गाला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. भिगवणमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे. इंदापूर तालुक्यात पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून, वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसल्याच्या घटना घडल्या आहेत.

भिगवणमध्ये मुसळधार पाऊस

इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे,  मुसळधार पावसामुळे संपूर्ण भिगवण परिसर जलमय झाला आहे. विशेषतः पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्विस रोडला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. हा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे. भिगवण बस स्थानकात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.  भिगवणच्या थोरात नगर भागात रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहताना दिसत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही घरांमध्ये पाणी देखील शिरलं आहे.

दरम्यान दुसरीकडे दौंडला देखील पावसानं झोडपलं आहे. दौंडमधील स्वामी चिंचोली गावाला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने गावचा संपर्क तुटला आहे. अनेक घरे पाण्याखाली बुडाली आहेत.

कालवा फुटला 

दुसरीकडे बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या निरा डावा कालव्याला पिंपळी लिमटेक या ठिकाणी भगदाड पडलं आहे. या कालव्याचे सर्व पाणी नागरिकांच्या शेतात आणि घरामध्ये शिरले असून, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरूच होते, त्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कालव्यात पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला यामुळे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे. कालव्याला पिंपळी लिमटेक भागात भगदाड पडल्याची माहिती मिळताच जलसंपदा विभागाने तातडीने नीरा डावा कालवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका 

बारामती तालुक्यात अतिवृष्टी होत असून नदी पात्र, कॅनॉल परिसरात नागरिकांनी जाऊ नये, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनास सहकार्य करावे, आपत्कालीन परिस्थितीच्या काळात प्रशासनाशी संपर्क साधावा.असे आवाहन बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)