राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. बारामतीमध्ये आता पुन्हा एकदा काका विरूद्ध पुतण्या लढत पाहायला मिळू शकते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात साखर कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. साखर कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान युगेंद्र पवार यांच्याकडून आता साखर कारखान्यांची निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आल्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका आणि पुतण्या आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले युगेंद्र पवार?
अजित पवार यांच्याविरोधात साखर कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभं करण्याचे संकेत युगेंद्र पवार यांच्याकडून देण्यात आले आहेत. साखर कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, माळेगाव साखर कारखाना, सोमेश्वर साखर कारखाना किंवा एकूण उसाच्या क्षेत्रामध्ये पवारसाहेबांचं फार मोठं योगदान आहे. आज नाही तर गेल्या चाळीस, पन्नास वर्षांपासून पवार साहेब यांचं या क्षेत्रात योगदान आहे. जर पवार साहेब आपल्या पाठिमागे आहेत. तिथे आपल्याकडे सक्षम उमेदवार आहेत आणि जर आपण तो साखर कारखाना वाचू शकतो तर मग निवडणूक लढवायला काय हरकत आहे, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता युगेंद्र पवार हे माळेगाव साखर कारखाना आणि सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपलं पॅनल उभं करण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास पुन्हा एकदा बारामतीमध्ये काका आणि पुतण्याची लढत पाहायला मिळू शकते.
विधानसभेत पराभव
युगेंद्र पवार यांनी गेल्यावेळी अजित पवार यांच्याविरोधात बारामती विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. काका-पुतण्याची ही लढत मोठी चुरशीची ठरली, मात्र या निवडणुकीत अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा पराभव केला. दरम्यान आता पुन्हा एकदा काका-पुतण्या आमने-सामने येण्याची शक्यता आहे.