एकीकडे महाराष्ट्रात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे, विदर्भ प्रचंड तापला असून, तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेलं आहे. मात्र दुसरीकडे हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर उर्वरित भागामध्ये हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे, त्यामुळे पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
एकीकडे महाराष्ट्रात तर पावसाचा इशारा देण्यात आलाच आहे,पण दुसरीकडे कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागानं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, पुणे, सातारा, अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
दुसरीकडे राज्यात उन्हाचा कडाका देखील वाढला आहे, सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रम्हपुरीमध्ये झाली आहे, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 41 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. गारपीट, पाऊस आणि वाढतं तापमान असं तिहेरी संकट सध्या राज्यावर आहे.