IMD Monsoon Update : महाराष्ट्रात मान्सूनची 12 दिवस आधीच एन्ट्री, पुढील काही तास धोक्याचे, या जिल्ह्यांना रेड अलर्ट

मान्सूनबाबत मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे यंदा वेळेपूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, तब्बल 12 दिवस आधीच मान्सूनने राज्यात प्रवेश केला आहे, दरवर्षी सामान्यपणे सात जूनला मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश होतो, मात्र यंदा 25 मे रोजीच मान्सूनने महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे.  राज्यातील काही भाग मान्सूनने व्यापाला आहे. दरम्यान दुसरीकडे सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे, चिंतेंची बाबत म्हणजे पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाकडून रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अर्लट देण्यात आला आहे, या दोन जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर दुसरीकडे पुणे, रत्नागिरी, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यात वाऱ्याचा वेग ताशी 40 किलोमीटर एवढा राहण्याची शक्यता आहे.

कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा  

दरम्यान हवामान विभागाकडून कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

राज्यभरात पाऊस 

महाराष्ट्राला पावसानं झोडपलं आहे, पुण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात देखील पावसानं दमदार हजेरी लावली आहे. जालन्यात मुसळधार पाऊस झाला, दुसरीकडे बारामती आणि सोलापुरातील करमाळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामध्ये मोठं नुकसान झालं आहे. वाशिमला देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला, या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत देखील सकाळपासून पाऊस सुरू आहे. दरम्यान यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.  यंदा बारा दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)