भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या मान्सूनसंदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून वेळे आधीच रविवारी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे येत्या 25 मे पर्यंत मान्सून हा केरळच्या किनारपट्टीवर दाखल होऊ शकतो. गेल्या वर्षी 30 मार्च रोजी मान्सूनची केरळमध्ये एन्ट्री झाली होती. मात्र यंदा वेळेपूर्वीच म्हणजे 25 तारखेला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2009 साली केरळमध्ये वेळेआधी मान्सून दाखल झाला होता, त्यानंतर आता तब्बल 16 वर्षांनी वेळेपूर्वीच मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.
पंधरा जूनपर्यंत देशातील बहुतांश भागात मान्सूनने व्यापण्याची शक्यता आहे.दरम्यान यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यंदा भारतामध्ये सरासरी 107 टक्के पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पेरणीपूर्व मशागतींना अनेक भागांमध्ये वेग आला आहे.
येत्या 25 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनची एन्ट्री दक्षिण भारत आणि मध्य भारतात होणार आहे, मात्र याच दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणजे सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. पुढील छत्तीस तास महत्त्वाचे असून, आयएमडीकडून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे, तर दुसरीकडे नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा देखील मिळाला आहे.
यंदा चांगल्या पावसाचा अंदाज
दरम्यान यंदा मान्सूनबद्दल गुडन्यूज आहे, ती म्हणजे देशात पावसाचं प्रमाण चांगलं राहणार आहे. सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.