उन्हाळा सुरू होताच बहुतेक लोकं वॉटर पार्ककडे वळू लागतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाण्यात मजा करायला आवडते. कडक उन्हाच्या गर्मीपासून वाचण्यासाठी वॉटर पार्क हे एक उत्तम ठिकाण आहे आणि तुम्ही थंड पाण्यात खूप मजा करू शकता. इथे गेल्यानंतर वेळेचे भान कोणालाच राहत नाही.
अशातच तुम्ही जेव्हा वॉटर पार्कला जाता तेव्हा या गोष्टींची खबरदारी घेतली नाही, तर मग सगळी मजा बिघडू शकते. जर तुम्हीही उन्हाळ्यात वॉटर पार्कला भेट देण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमचा अनुभव संस्मरणीय आणि सुरक्षित बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.
योग्य कपडे घाला
वॉटर पार्कमध्ये जाण्यापूर्वी एकदा सुनिश्चित करा की तुम्ही व मुलांनी पोहण्याकरिता योग्य कपडे घातले आहेत का नाही. पाण्यात कॉटन कपडे घालू नका, कारण हे कपडे पाण्यात गेल्यावर जड होतात आणि तुमच्या हालचालीवरही परिणाम करतात. त्याऐवजी, नायलॉन किंवा स्पॅन्डेक्स मटेरियलपासून बनवलेले कपडे निवडा, जे लवकर सुकतात.
सनस्क्रीन लावायला विसरू नका
उन्हाळ्यात प्रखर सूर्यप्रकाश त्वचेला टॉन करतो. यासाठी तुम्ही जेव्हा वॉटर पार्कमध्ये जाता तेव्हा वॉटरप्रूफ सनस्क्रीन लावणे महत्वाचे आहे. कमीत कमी SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेले सनस्क्रीन वापरा आणि दर दोन तासांनी पुन्हा लावा, विशेषतः जर तुम्ही वारंवार पाण्यात असाल तर.
स्वच्छतेची काळजी घ्या
वॉटर पार्कमध्ये अनेक लोकं एकाच ठिकाणी पाण्यात खेळत असतात, त्यामुळे संसर्गाचा धोका होऊ शकतो.नाकात, डोळ्यात किंवा तोंडात पाणी जाण्यापासून टाळा. वॉटर राईड्सवर जाण्यापूर्वी आणि नंतर आंघोळ करायला विसरू नका. जर तुम्हाला त्वचेचा संसर्ग किंवा जखम असेल तर वॉटर पार्कमध्ये जाऊ नका.
हायड्रेटेड रहा
तुम्ही जेव्हा वॉटरपार्क मध्ये पाण्यात जाता तेव्हा अनेकवेळा खेळ खेळताना वेळेकडे लक्ष जात नाही. त्यामुळे लोकं अनेकदा पाणी पिण्यास विसरतात, ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. म्हणून, तुमच्यासोबत पाण्याची बाटली ठेवा आणि अधूनमधून पाणी पित राहा.
नियमांचे पालन करा
प्रत्येक वॉटर राईडचे स्वतःचे नियम असतात जसे की उंची, वजन मर्यादा, राईडवर बसण्याची पद्धत इत्यादी. हे नियम पाळणे केवळ तुमच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे नाही तर ते तुमचा अनुभव देखील सुधारते. जर तुम्हाला परवानगी नसेल तर कोणत्याही राइडसवर स्वतःला जबरदस्तीने बसवू नका.
मुलांवर लक्ष ठेवा
तुम्ही जर मुलांसोबत वॉटर पार्कमध्ये जात असाल तर त्यांची सुरक्षा ही तुमची पहिली जबाबदारी आहे. मुलांना पाण्यात एकटे सोडू नका. त्यांना राईडवर घेऊन जाण्यापूर्वी त्यांचे वय आणि उंची लक्षात ठेवा.