मी डेअरिंग दाखवली नसती तर… हगवणे कुटुंबीयांच्या थोरल्या सुनेचा खळबळजनक दावा काय?

पुण्यातील वैष्णवी शशांक हगवणेच्या मृत्यूमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवी शशांक हगवणेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ केल्याने वैष्णवीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं अशी तक्रार तिच्या घरच्यांनी पोलिसांत केली आहे. वैष्णवीच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. हुंड्यासाठी लेकीचा छळ सुरू होता. त्यातून तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप वैष्णवीच्या आई-वडिलांनी केला आहे.

घरच्यांच्या विरुद्ध जाऊन वैष्णवीने हे लग्न केलं होतं. परंतु तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत होता. दरम्यान घटना घडली तेव्हापासून वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील हगवणे फरार झाले आहेत, तर वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हगवणे कुटुंबीयांच्या थोरल्या सुनेकडून धक्कादायक खुलासे 

आता या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे ते हगवणे यांची थोरली सून मयुरी जगताप. जानेवारी महिन्यापासूच मयुरीने हगवणे यांचं घरं सोडलं असून ती माहेरी आई-भावासोबत राहत आहे. वैष्णवीप्रमाणेच मयुरीचाही छळ झाला असून तिची साथ दिल्याबद्दल हगवणे कुटुंबाने त्यांच्याच मुलाचाही छळ केला, मारहाण केली,असा आरोप मयुरीने केला आहे. नणंद, दीर, सासू तिला आणि तिच्या नवऱ्याला कायम टॉर्चर करायचे असंही तिने म्हटलं आहे. ती म्हणाली की, “मला माझ्या नवऱ्याची साथ होती म्हणून मी सर्व निभावून नेलं. पण वैष्णवीला तिच्या नवऱ्याची कधीच साथ मिळाली नाही, त्यामुळे हे सर्व घडलं. माझी नणंद मला खायला सुद्धा देत नसायची. मी किचनमध्ये गेले तरी नणंद किचनमध्ये यायची. खाण्याचेही हाल होत होते. त्यामुळे आम्ही वेगळं राहायचा निर्णय घेतला.दीड वर्षांपासून आम्ही वेगळं घर घेऊन रहात होतो.”

“वैष्णवीचे घरचेही आमच्याकडे यायचे…”

पुढे ती म्हणाली की “वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर नवऱ्याचा फोन आला होता. माझ्या आईला फोन केला होता. मला दवाखान्यात बोलावलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवऱ्याचा फोन आला. पोलीस स्टेशनला जावं लागेल असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांचा काहीच संपर्क झाला नाही. मी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क झालेला नाही. या प्रकरणात माझ्या मिस्टरांचा काहीच संबंध नाहीये. पण त्यात त्यांचं नाव कसं गेलं ते माहीत नाही. कारण आम्ही वेगळंच राहायला होतो. वैष्णवीनेही तिच्या घरच्यांना सांगितलं असेल. वैष्णवीचे घरचेही आमच्याकडे यायचे आणि माझ्याबद्दल विचारायचे” असं म्हणत मयुरीने अनेक गोष्टींचा खुलासा केला.

“मी त्या घरात डेअरिंग दाखवली म्हणून मी जिवंत आहे…”

पुढे वैष्णवीच्या आत्महत्येबद्दल प्रतिक्रिया देताना ती म्हणाली की, “वैष्णवी माझ्याशी बोलली जरी असती तरी मी तिची साथ दिली असती. कारण मी त्या घरात डेअरिंग दाखवली म्हणून मी आज जिवंत आहे. मी गप्प बसले असते तर मीही कदाचित इथे नसतेच. पण वैष्णवीने मला सांगायला हवं होतं. तिने घरच्यांना सांगायचं होतं. तिने तसं का केलं नाही. नवरा आणि नणदेचं ती ऐकत गेली. माझ्याशी ती बोलली असती तरी तिला या लोकांनी मारलं असतं. इतके ते भयानक आहेत. म्हणून तिला त्रास होऊ नये म्हणून मी तिच्याशी बोलले नाही.”

हगवणे कुटुंबाबद्दल मोठी सून मयुरीचे अनेक धक्कादायक खुलासे

तर, अशापद्धतीने आता हगवणे कुटुंबाच्या मोठ्या सुनेनं अनेक धक्कादायक खुलासे केल्याने या प्रकरणाला आता आणखीणच गंभीर वळण लागलं आहे. दरम्यान वैष्णवीच्या घरच्यांनी हगवणे कुटुंबीयांना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. हुंडाबळीचा प्रकार असल्याचा आरोप तिच्या घरच्यांकडून, कस्पटे कुटुंबाकडून हत असून हगवणे कुटुंबावर मकोका लावून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)