डायबिटिजसोबतचा संघर्ष सोपा नाही. म्हणूनच रक्तातील साखरेचे प्रमाण आणि हृदयाचे संरक्षण योग्यरीत्या राखणे अत्यंत आवश्यक आहे. उच्च रक्तदाब, रक्तातील अतिरिक्त साखर आणि कोलेस्टेरॉलमुळे डायबिटिज असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. त्यामुळे हा धोका कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आणि डॉक्टरांचा सल्ला पाळणे गरजेचे आहे. चला तर पाहूया, डायबिटिज असताना हृदयाची योग्य काळजी कशी घ्यावी:
रक्तातील साखरेची तपासणी
रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवणे एकूणच आरोग्यासाठी आणि हृदयविकार टाळण्यासाठी अत्यावश्यक आहे. रक्तातील जास्त साखर रक्तवाहिन्यांचे नुकसान करू शकते आणि विविध गुंतागुंती निर्माण करू शकते. नियमितपणे ग्लुकोजची पातळी तपासण्यासाठी आणि औषधे किंवा आहारात आवश्यक ते बदल करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संतुलित आहार घ्या
डायबिटिज आणि हृदयाचे आरोग्य दोन्ही राखण्यासाठी पोषणाचा मोठा वाटा असतो. म्हणूनच योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. फळे आणि भाज्यांमध्ये स्टार्च नसलेल्या भाज्या जसे की ब्रोकोली आणि बेरी यांचा समावेश करा. संपूर्ण धान्यांचे अन्न जसे की ओट्स, क्विनोआ आणि संपूर्ण गव्हाची पोळी खा. आरोग्यदायी फॅट्समध्ये ॲव्होकाडो, बदाम, बिया आणि ऑलिव्ह तेल यांचा समावेश करा. कमी फॅट असलेला प्रथिनयुक्त आहार जसे की कोंबडी, मासे, बीन्स आणि टोफू खाऊ शकता. संतृप्त फॅट्स, ट्रान्स फॅट्स आणि प्रक्रिया केलेल्या साखरेचा आहारात टाळावा, कारण यामुळे कोलेस्टेरॉल वाढतो आणि शरीरात दाह निर्माण होतो.
शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा
व्यायाम केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, वजन कमी होते आणि हृदय निरोगी राहते. आठवड्यातून किमान 150 मिनिटे मध्यम तीव्रतेचा एरोबिक व्यायाम करा. चालणे, पोहणे, सायकल चालवणे यासारख्या सोप्या व्यायामप्रकारांवर लक्ष द्या. कोणताही नवीन व्यायाम प्रकार सुरू करण्यापूर्वी डॉक्टर किंवा फिटनेस तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
धूम्रपान सोडा
धूम्रपान आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि डायबिटिज असलेल्या रुग्णांसाठी तर अधिकच घातक. धूम्रपान सोडल्याने रक्ताभिसरण सुधारते, रक्तदाब कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
स्वतःला तणावमुक्त ठेवा
सततचा तणाव रक्तातील साखर आणि रक्तदाब दोन्ही वाढवतो आणि हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतो. ध्यान, श्वसनाचे व्यायाम, योगाभ्यास, आवडती छंद जोपासणे यासारख्या उपायांनी तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)