माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. राम शिंदे यांची सभापतीपदी निवड झाल्याबद्दल नांदेडमध्ये त्यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये बोलताना अशोक चव्हाण यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. रोहित पवार यांनी मला कर्जत -जामखेड मतदारसंघात बोलावलं होतं. मी तेव्हा दुसऱ्या पक्षात होतो. पण मला तिथल्या लोकांनी कानात सांगितलं की इथे खरा माणूस हे राम शिंदे हेच आहेत, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं, आता अशोक चव्हाण यांच्या टीकेला ट्विट करत रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
‘आदरणीय अशोक चव्हाण साहेब, विचारधारेशी निष्ठा नसेल तर राजकीय अनुभवाला काहीच अर्थ राहत नाही, ही पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या आमच्यासारख्या नव्या पोरांची आपल्यासारख्या जेष्ठ आणि अनुभवी नेत्यांकडे तक्रार आहे. बाकी, आपल्याबद्दल कायमच आदर आहे, होता आणि राहील, परंतु अनेक जेष्ठ नेत्यांच्या भूमिका आणि निष्ठा एवढ्या लवकर बदलतात हे बघून आमच्यासारख्या नव्या पोरांना, कार्यकर्त्यांना दुःख होतं, बाकी काही नाही!’ असा खोचक टोला रोहित पवार यांनी अशोक चव्हाण यांना लगावला आहे.
आदरणीय अशोक चव्हाण साहेब, विचारधारेशी निष्ठा नसेल तर राजकीय अनुभवाला काहीच अर्थ राहत नाही, ही पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या आमच्यासारख्या नव्या पोरांची आपल्यासारख्या जेष्ठ आणि अनुभवी नेत्यांकडे तक्रार आहे.
बाकी, आपल्याबद्दल कायमच आदर आहे,…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 14, 2025
अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?
राम शिंदे यांची विधान परिषदेचे सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नाहीये, तर ते बिनविरोध निवडून आले आहेत. अहिल्यानगरमधून जो माणूस निवडून येतो तो राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडून येऊ शकतो. ते पुढे मोठ्या मतदाधिक्यानं निवडून येतील. मला रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघात बोलावलं होतं, तेव्हा मी दुसऱ्या पक्षात होतो, पण तेथील लोक माझ्या कानात सांगत होते, राम शिंदे हेच खरा माणूस आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे, त्यावर आता रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.