आयबी, एनआयएची टीम डोंबिवलीत दाखल, मोने-जोशी-लेले कुटुंबियांची करणार चौकशी

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यातील सहा जण महाराष्ट्रातील आहेत. डोंबिवली येथील अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांसमोर दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घातल्या. त्यांच्या कुटुंबियांनी दहशतवाद्यांना जवळून पाहिले आहे. पहलगाम हल्ला प्रकरणात केंद्र सरकारकडून पाकिस्तानची नाकेबंदी केली जात आहे. त्याचवेळी हल्लेखोर दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. त्याचमुळे राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) यांच्याकडून तपास सुरु करण्यात आला आहे. एनआयए आणि आयबीचे पथक डोंबिवलीत दाखल झाले आहे. ते मोने-जोशी-लेले कुटुंबियांची करणार चौकशी करणार आहे.

काश्मीरमधील पहलगाम येथे डोंबिवली येथील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले कुटुंबियांसोबत गेले होते. पहलगाममध्ये ते असताना दहशतवादी घुसले. त्यांनी हिंदू कोण आहे? असे विचारत गोळ्या झाडल्या. त्यात अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले या तिघांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी दहशतवाद्यांना अगदी जवळून पाहिले आहे. त्यामुळे आयबी आणि एनआयएची टीम डोंबिवलीत दाखल झाली आहे. सध्या ही टीम डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यानंतर मोने, जोशी आणि लेले यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची चौकशी करणार आहे.

संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यांच्या हाताला गोळी लागून गेली होती. त्यांनी दोन दहशतवाद्यांना पाहिल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच घटनास्थळी नेमके काय घडले? ते ही सांगितले. या सर्व प्रकारचा फायदा तपासाला होऊ शकतो. त्यातून दहशतवाद्यांसंदर्भात माहिती मिळू शकते, यामुळे एनआयएचे पथक चौकशी करण्यासाठी डोंबिवलीत दाखल झाले आहे.

हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फोटो आणि रेखाचित्रे तपास संस्थांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आदिल हुसेन ठोकर (रा. अनंतनाग), हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तल्हा भाई अशी या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. फरार दहशतवाद्यांचा पत्ता सांगणाऱ्यांना २० लाख रुपयांचे बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले आहे. दहशतवाद्यांच्या समोर आलेल्या फोटोंमध्ये पठाणी सूट घातलेला दहशतवादी अत्याधुनिक शस्त्रासह दिसत आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)