खेडकर यांची पुणे जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. खेडकर या ३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणासाठी रुजू झाल्या. त्यावेळी त्यांनी अवास्तव मागण्या केल्या. खेडकर यांच्या वडिलांनी विविध प्रकारच्या सुविधा देण्याची मागणी करताना सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदारांना अयोग्य शब्दप्रयोग वापरले. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खासगी दालनातील सर्व साहित्य बाहेर काढून तेथे स्वत:चे कार्यालय थाटले. खेडकर यांनी अशाच प्रकारचे वर्तन विविध सरकारी खात्यांतही केल्याची बाब अहवालातून स्पष्ट झाल्याने या कुटुंबाचे विविध कारनामे आता समोर येऊ लागले आहेत.
खेडकर या २७ आणि २८ जून रोजी जिल्हा न्यायालयातील प्रशिक्षणाला गेल्या नाहीत. जिल्हा कोषागार कार्यालयातील १ ते ५ जुलै या कालावधीतील प्रशिक्षणादरम्यान त्यांनी स्वतंत्र दालन देण्याची मागणी केली. २४ ते २६ जून या कालावधीत प्रशिक्षणादरम्यान खेडकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे शासकीय वाहनाची मागणी केली.
जमिनीसाठी पोलिसांवर दबाव
खेडकर कुटुंबीयांची मुळशी तालुक्यात २५ एकर जमीन आहे. या जमिनीच्या खरेदीवेळी शेतकऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खेडकर कुटुंबीयांवर आहे. याप्रकरणी खेडकर कुटुंबाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अहवालात म्हटले आहे.
सरकारला अहवाल पाठवणार
पूजा खेडकर यांच्या वर्तणुकीबाबत कोषागार कार्यालय, जिल्हा न्यायालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला आलेले अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून हे अहवाल केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय, तसेच लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीला पाठविण्यात येणार आहेत.
मनोरमा यांच्या अडचणीत वाढ
पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील जागेच्या वादातून शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप करणारी चित्रफीत प्रसारित झाली आहे. त्यामध्ये मनोरमा हातात छोटे पिस्तूल घेऊन बाउन्सरच्या मदतीने शेतकऱ्यांना धमकावताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या व्हिडीओची सत्यता पडताळली जात असून, याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
‘चौकशी समितीसमोरच बोलणार’
वाशीम : केंद्र सरकारच्या चौकशी समितीसमोर निर्धारित प्रक्रियेनुसार आपले म्हणणे मांडणार आहे, असे पूजा खेडकर यांनी स्पष्ट केले. वाशीमला नियोजन भवन परिसरात शुक्रवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकारने गुरुवारी चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. यासंदर्भात दोन आठवड्यात अहवाल देण्याचे निर्देश समितीला दिले आहे. या अनुषंगाने त्यांना पत्रकारांकडून विचारणा करण्यात आली. त्यांनी कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले. आपल्याला बोलण्याची परवानगी नसल्याचे सांगितले.