पूजा खेडकर यांनी दूरदृष्टी दोष असल्याचे प्रमाणपत्र दाखवून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्या असल्याची माहिती आहे. आयोगाच्या निवड समितीने पूजा खेडकर यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात तब्बल सहा वेळा वैद्यकीय चाचणी करण्यासाठी बोलावले होते. परंतु त्यांनी जाण्यास टाळाटाळ केली. खोट्या प्रमाणपत्रावर त्यांनी पद मिळवलं असल्याचं बोललं जातंय.
कोण आहेत पुजा खेडकर?
पूजा खेडकर या 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. जून महिन्यामध्ये त्यांची ट्रेनी ऑफिसर म्हणून त्यांची पुण्यात नियुक्ती करण्यात आली होती. परंतु नंतर काही वादांमुळे त्यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली.
वडीलही माजी अधिकारी
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या पूजा खेडकर कन्या आहेत. दिलीप खेडकर यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळवत त्यांनी अहमदनगर दक्षिणमधून उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पूजा खेडकर यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून कारभार पाहत आहेत.
दरम्यान, पूजा खेडकर यांना खोट्या प्रमाणपत्रावर नियुक्ती कुणी दिली? आणि या मागे कुणाचा हात आहे? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांनी अवैध पद्धतीने आयएएस मिळवलं ही गोष्ट सिद्ध झाली तर त्यांच्यावर कोणती कारवाई होणार? याकडे सर्वांचेच लक्षं असणार आहे.