आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिपंरी -चिंचवडमध्ये बोलताना चौफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. ते विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी शरद पवार यांना काल ही दैवत मानत होतो, आज ही दैवत मानतो, पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
अण्णा बनसोडे हे गरीब कुटुंबातील कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून अण्णा बनसोडे यांना विधासभा उपाध्यक्ष केलं. पान टपरी चालवणारे अण्णा आता आमदार आहेत, आधी नगरसेवक होते, आता उपाध्यक्ष झाले आहेत. अण्णा बनसोडे यांना अपयश आले, तेव्हा, गौतम चाबुकस्वार आमदार झाले. परंतु त्यांनी हार मानली नाही, ते पुन्हा आमदार झाले. 1991 ला मी इथे आलो तेव्हा गाववाले आणि बाहेरचे अशी चर्चा खूप व्हायची, पण आता अण्णा बनसोडे हे देखील इथलेच झाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. जगातील अनेक देश अमेरिकेत निर्यात करत आहेत. त्यांना याचा फटका बसत आहे. कोविड नंतरचं हे सर्वात मोठं संकट आहे. याला बाजूला सारून आपल्याला पुढे जायचं आहे.
माझ्या हातात हे शहर होतं. महापौर, विरोधी पक्षनेते, हे सर्व मी करायचो, माझा स्वार्थ मी कधी बघितला नाही. जनतेचा विकास करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवला. नदी, कचरा हा महत्वाचा प्रश्न आहे. याबाबत काही जणांचं वेगळं म्हणणं आहे. त्यांच्या बोलण्यात तथ्य असेल तर आणि जनतेच्या अडचणीच ठरणार असेल तर एक पाऊल पुढे मागे टाकू, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा अजित पवार यांनी मिष्कील टोला लगावल्याचं देखील पाहायला मिळालं. लोकसंख्या वाढायला वेळ लागत नाही. लोकांनी मनावर घेतल की लोकसंख्या वाढते, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.