माणसांना रोबॉट नाही बनवायचंय, मोठी स्वप्न पाहा ; मोदींचं तरुण क्रिएटर्ससाठी काय आवाहन?

भारताच्या पहिल्या ‘जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन’ (वेव्हज) शिखर परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. या परिषदेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी तरुण क्रिएटर्सना खास आवाहन केलं. “आपल्याला माणसांना रोबॉट नाही बनवायचंय. आपल्याला माणसाला अधिकाधिक संवेदनशील आणि समृद्ध करायचं आहे”, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी ‘क्रिएटिव्ह रिस्पॉन्सिबिलीटी’वर अधिक भर दिला. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तंत्रज्ञानाची भूमिका वाढत असतानाच मानवी संवेदना कायम ठेवण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.

न्यूज 9 ने WAVES Edition ग्लोबल समिटचं आयोजन केलं आहे. जिओ कनव्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित या शिखर परिषदेत ते बोलत होते. “क्रिएटिव्हिटीच्या जगातील दिग्गजांसमोर मी आणखी एक विषय मांडतो. तो विषय आहे, क्रिएटिव्ह रिस्पॉन्सिबिलीटीचा. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात टेक्नॉलॉजीची भूमिका वाढत आहे. अशावेळी मानवी संवेदना कायम ठेवण्यासाठी एक्स्ट्रा एफर्टची (अधिक प्रयत्न) गरज आहे. ते क्रिएटिव्ह वर्ल्डच करेल. आपल्याला मनुष्याला रोबॉट नाही बनवायचंय. आपल्याला माणसाला अधिकाधिक संवेदनशील आणि समृद्ध करायचं आहे,” असं यावेळी मोदी म्हणाले.

कलेवर अधिक भर देण्याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “व्यक्तीची समृद्धी ही माहिती जगताच्या पर्वतातून येणार नाही, टेक्नॉलॉजीतून येणार नाही. त्यासाठी आपल्याला गीत, संगीत, कला, नृत्याला महत्त्व द्यावं लागेल. या गोष्टींनी हजारो वर्षांपासून मानवीय संवेदनाला जागृत ठेवलं आहे. आपल्याला ते अजून मजबूत करायचं आहे. आज आपल्या तरुण विचाराला मानवताविरोधी विचारांपासून वाचवलं पाहिजे. वेव्हज हे काम करू शकतं. या जबाबदारीपासून मागे हटलो तर युवा पिढीसाठी ते घातक ठरेल. ग्लोबल कोऑर्डिनेशनही (जागतिक समन्वय) आता तेवढंच महत्त्वाचं आहे. हा मंच आपल्या क्रिएटर्सना ग्लोबल स्टोरी टेलर्सशी कनेक्ट करेल. आपल्या एनिमेटर्सना ग्लोबल व्हिजनरीशी जोडेल. ग्लोबल चॅम्पियन बनवेल.”

“तुम्हाला एक असं प्लॅटफॉर्म देऊ, जिथे क्रिएटिव्ह आणि कोडिंग एकत्र होईल, सॉफ्टवेअर आणि स्टोरी टेलिंग एकत्र असेल. तुम्ही या प्लॅटफॉर्मचा वापर करा. मोठी स्वप्न पाहा. ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकद लावा,” असं आवाहन मोदींनी केलंय. या परिषदेत नरेंद्र मोदींनी सर्व ग्लोबल इन्व्हेस्टर, ग्लोबल क्रिएटर्स यांना आमंत्रित केलं. “तुम्ही भारताला तुमचं कंटेंट प्लेग्राआऊंड बनवा,” असंही आवाहन त्यांनी केलंय. त्याचप्रमाणे पहिल्या वेव्हज समिटसाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)