HSC Result 2024: हॉटेलात काम करुन रात्रशाळेतून पहिला, पुण्यातील प्रशांतजितची ‘कहानी जित की’

प्रतिनिधी, पुणे : हलाखीची परिस्थिती असूनही, खचून न जाता दिवसा हॉटेलमध्ये काम आणि रात्रीच्या वेळेस अभ्यास करून प्रशांतजित सोनू बेंडलने ७८.५० टक्के गुण मिळवून रात्रशाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. वाणिज्य शाखेत शिक्षण घेऊन, पुढे बँकिंग, फायनान्समध्ये काम करणार असल्याचे प्रशांतजितने सांगितले.प्रशांतजित हा मूळचा चिपळूणचा आहे. गेल्या काही वर्षांपासून आईसह लक्ष्मीनगर येथे राहत असून, त्याचे वडील मुंबईत मंडप सजावटीचे काम करतात. सकाळी ७.३० ते सायंकाळी पाच या वेळेत प्रशांतजित हा हॉटेलमध्ये काम करतो. त्यानंतर रात्री ‘पूना नाइट स्कूल’मध्ये शिक्षण घेऊन त्याने बारावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवले आहे. भविष्यात शिक्षण पूर्ण करून बँकिंग, फायनान्समध्ये काम करण्याचे त्याचे ध्येय आहे.
Pune Porsche Accident: अपघातापूर्वीचा दीड तास, ४८ हजार अन् २ पब; पोलीस आयुक्तांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

वाहनाच्या शोरूममध्ये दिवसा काम आणि रात्री अभ्यास करून कोमल किरवे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिला ७६.६७ टक्के गुण मिळाले आहेत. कोमल वेल्हे तालुक्यातील विंझर या गावाची रहिवासी असून, लहानपणापासूनच कोथरूडमध्ये राहायला आहे. बारावीच्या परीक्षेत सरस्वती मंदिर संस्थेचे पूना नाइट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९७.५० टक्के आहे. या परीक्षेला बसलेल्या ८०पैकी ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राजेश तानाजी बेंडलने ७२.३३ टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळविला आहे.

कचरावेचकांच्याही मुलांचे यश

कचरावेचक, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मुलांनी बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळविले आहे. पुढील शिक्षणासाठी मोठी मेहनत घेणार असल्याचे यशस्वी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतीतील या मुलांनी मेहनत करून, बारावीच्या निकालात यश नक्कीच मिळवले आहे. बारावीच्या परीक्षेत करीना जैस्वाल हिने ८३.६७ टक्के (वाणिज्य शाखा), प्रतीक्षा पिंगळेने ७७.०३ टक्के (कला शाखा), मेघना मोरेने ७५.०६ टक्के (वाणिज्य शाखा), अंकित पंडित याने ७५ टक्के आणि मेघना बुरंगे हिने ६०.८३ टक्के (कला शाखा) गुण मिळविले.

करिनाची आई शकुंतलाबाई पिंपरी-चिंचवडमध्ये घंटागाडीवर स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करीत आहेत. तिच्या वडिलांचे २०१२मध्ये निधन झाले. तिची मोठी बहीण नेहा ‘टाटा मोटर्स’मध्ये गुणवत्ता विभागात काम करते. मेघनाने ७५.०६ टक्के गुण मिळवले आहेत. मेघनाला कंपनी सेक्रेटरी म्हणून भविष्यात काम करायचे आहे. तिचे वडील कचरावेचक आहेत.

अंकितने ७५ टक्के गुण मिळवले असून, सैन्यदलात काम करण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. त्याने नुकतीच सैन्यदलाची परीक्षा दिली. त्याची बहीण गेल्या महिन्यात भारतीय नौदलात दाखल झाली आणि माझे स्वप्न भारतीय सैन्यात भरती होण्याचे आहे.