विभागाचा निधी वळवला मग 100 दिवसांचा रिपोर्ट कार्ड चांगला कसा होणार? मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा व्यक्त केली खदखद

विधानसभा निवडणुकीच्या प्रचंड यशानंतर मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांचा रिपोर्ट कार्ड जारी केला. त्यामध्ये 100 दिवसांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अन् मंत्री आदिती तटकरे यांना पहिला क्रमांक मिळाला आहे. त्यांना 100 पैकी 80 टक्के गुण मिळाले आहे. त्यावरुन शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्याच सरकारला घेरले आहे. आमच्या खात्याचा निधी वर्ग करण्यात आला. मग त्यांचा नंबर वन आला. आम्हाला काम करण्याची संधी मिळाली नाही तर आमचा उल्लेख 100 दिवसांच्या कार्यक्रमात कसा होणार? असा प्रश्न संजय शिरसाट यांनी विचारला आहे.

संजय शिरसाट यांनी सांगितले की, आदिती तटकरे यांच्या खात्यात आमच्या खात्याचा निधी वर्ग केला. त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे गेले. त्यानंतर त्यांचा विभाग नंबर एक वर आला. या कामगिरीत आमचा कुठेही उल्लेख नाही. कारण आम्हाला काम करण्याची संधी मिळाली नाही. मग आमचा उल्लेख 100 दिवसांच्या उपक्रमामध्ये कसा होणार? त्यामुळे हे खातेच बंद करून टाका, हे चांगले आहे. एकीकडे माझे पाय तोडायचे आणि दुसरीकडे मला म्हणायचे की, पळ… तर हे शक्य होणार नाही. हा माझ्यावर होत असलेला अन्याय आहे.

खात्यामधील निधी महिला व बालकल्याण विभागाकडे दिल्यामुळे नाराज झालेले संजय शिरसाट यांनी खात्याकडे निधी नसेल तर आम्ही नेमके काय काम करत आहे, हे जनतेला कसे कळणार? सरकारला कसे कळणार? असा प्रश्न विचारला. ते म्हणाले, समाज कल्याण विभाग हे गोरगरीब जनतेला न्याय देणारे विभाग आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते आहे. त्यांनी मोठ्या मनाने या विभागाला जास्तीत जास्त निधी द्यायला हवा. या खात्याचा निधी इतरत्र वर्ग करायला नको. मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मी सगळे आपबीती सांगणार आहे.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना संजय शिरसाट यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यानंतर सरकारची तयारी जोरात सुरू आहे. संजय राऊत यांना परराष्ट्र धोरण माहीत नाही. सुरक्षेचे काही धोरण असते, हे माहीत नाही. यासंदर्भात जे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, ते इतरत्र बाहेर सांगितले जात नाही, हे त्यांना कळत नाही का? असा प्रश्न संजय शिरसाट यांनी विचारला.

रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिरसाट यांनी मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळेल, असे मला वाटते. दीपक केसरकर यांनी जर म्हटले की ते पुढची निवडणूक लढवणार नाही तर हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. त्याबाबत मी काही बोलू शकत नाही. पण ते वरिष्ठ नेते आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री राहिलेले आहेत. त्यांचा पक्षाने नेहमीच आदर केलेला आहे.

नाना पाटेकर यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची स्तुती केली. ती अगदी योग्य आहे. स्वतः कर्जबाजारी होऊन एकनाथ शिंदे यांनी निवडणूक लढवली आहे. त्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही लवलेश नाही. खरंच या माणसाला मानले पाहिजे. मुख्यमंत्री असताना पूर्ण महाराष्ट्राचा कानाकोपरा त्यांनी पिंजून काढला होता, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)