Horse Business : नुकरा प्रजातीतील उंच घोडा इंदापूरात, घोड्याच्या बळावर तरुण ठरणार व्यवसायातील ‘सिकंदर’

इंदापूर : अलीकडे घोड्यांचा पागा म्हणजे अत्यंत श्रीमंत, गर्भश्रीमंतांचा शौक समजला जातो. पण इंदापूर तालुक्यातल्या अकोलेसारख्या काही वर्षांपूर्वीच्या बारमाही दुष्काळी भागातही आजमितीला अत्यंत उच्च दर्जाचा स्टड फार्म उदयास आला आहे. अकोलेतील युवा शेतकरी निलेश अष्टेकर यांच्या शिवगड स्टडफॉर्मची आता तर राष्ट्रीय पातळीवर देखील दखल घेतली गेली आहे.

इंदापूर तालुक्यातील अकोलेसारख्या गावात ‘स्टड फार्म’ याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले, अनेकांनी वेड्यातही काढले, परंतु या नवतरुणाने घोड्यांच्या उच्च जातकुळीचा अभ्यास करत त्यातून अतिउच्च दर्जाचे घोडे स्वतःच्या फार्ममध्ये पाळले आहेत. जे घोडे पाहण्यासाठी देशाच्या विविध भागातून अश्वप्रेमी येत असतात.
पुण्याच्या दिपालीची भन्नाट कल्पना! लॉकडाऊनचा फायदा घेत सुरू केलं Installation Art, सगळीकडे होतेय कलेची चर्चा
खरंतर पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश अशा राज्यांमध्ये घोडे पाळणे, त्यांच्या स्पर्धा त्याचबरोबर उच्च जातकुळीचे घोडे पाळण्याचा शौक मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र याच गोष्टीत करिअर करण्याची किमया इंदापूर तालुक्यातील अकोले येथील निलेश अष्टेकर यांनी साधली आहे. तसेच मेहनतीच्या साथीने यशस्वी देखील करून दाखवली आहे.

तब्बल पंचवीस वर्षे घोड्यांच्या उच्च जात कुळीचा अभ्यास केल्यानंतर निलेश अष्टेकर यांनी इंदापूर तालुक्यातील अकोले गावाची या स्टड फार्मसाठी निवड केली. त्यामध्ये अगदी तब्बल 69 इंचांपर्यंतच्या उंच घोड्यांची देखभाल करणे आणि त्यातून उच्च प्रतीची वंशावळ निर्माण करण्याचा प्रयोग त्याने सुरू केला. नुकरा, मारवाडी, काठेवाडी अशा विविध जाती सांभाळणे हे उच्च श्रीमंतीचे लक्षण समजले जाते. निलेश यांच्याकडे आता नुकरा सिकंदर नावाचा घोडा आहे की जो घोडा पाहायला राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून अश्वप्रेमी येतात. या घोड्याला एका कंपनीने चक्क सत्तर लाख रुपयांची बोली लावली होती. हा घोडा प्रजननासाठी वापरला जातो त्याच्या एक वेळच्या प्रजननाच्या प्रक्रियेचा खर्च ३१ हजार रुपयापर्यंत आकारला जातो.
Nashik News : गृहिणींना दिलासा! वाढत्या महागाईतही खाद्यतेलांचे दर स्थिर…असे आहेत आजचे दर
सिकंदर घोडा हा विशेषतः सारंगखेडा येथील देशभरात नावाजलेल्या स्पर्धेतील विजेता घोडा आहे. या घोड्यापासून उच्च प्रतीची वंशावळ तयार करणे हा उद्देश ठेवून हा घोडा सांभाळणल्याचे निलेश यांनी सांगितले. नुकरा आणि मारवाडी घोड्यांना बाजारात प्रचंड मागणी असून या घोड्यांच्या किमती अगदी लाखापासून ते कोट्यावधी रुपयांच्या घरात जातात. काही दिवसांपूर्वीच भीमा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या व पूर्वी ज्यांचं अस्तित्व होतं अशा भीमथडी घोड्यांच्या नामशेष जातींना देखील पुन्हा पुनर्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गावागावात ‘स्टड फार्म’ तयार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सांगितले जाते.