Honey Trap: पतीला हनी ट्रॅपमध्ये अडकवून उकळले दहा लाख रुपये; पत्नीसह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवडी येथे वास्तव्यास असलेले एक कुटुंब आणि त्याच्या घरातील तरुण एका महिलेच्या आणि तिच्या साथीदारांच्या हनी ट्रॅपमध्ये फसले. उत्तर प्रदेशच्या या महिलेने सर्वप्रथम आपले वय लपवून तरुणासोबत लग्न केले. आधी मधाळ बोलण्यातून विश्वास संपादन केला. नंतर वेगवेगळ्या माध्यमांतून धमक्या देत सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम पती आणि कुटुंबीयांकडून वसूल केली. याप्रकरणात रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

शिवडीतील एक कुटुंब घरातील मुलासाठी वधूचा शोध घेत होते. याचवेळी एका लग्न जुळविणाऱ्या महिलेसोबत त्यांची ओळख झाली. त्यांनी या महिलेकडे आपल्या मुलाची सर्व माहिती दिल्यानंतर तिने उत्तर प्रदेश येथील एका तरुणीचे स्थळ आणले. मुलाची तिच्यासोबत ओळख करून दिली. या तरुणीने सर्व खोटी माहिती देत या तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांचे रितीरिवाजानुसार लग्न झाले. काही दिवस चांगले गेल्यानंतर नवविवाहितेने सासरच्या मंडळींना त्रास देणे सुरू झाले. तिच्या घरच्यांचाही तिला पाठिंबा होता.

पतीकडून तिने जवळपास दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम उकळली. सर्वांनी मिळून फसविल्याचे लक्षात आल्यावर मुलाच्या कुटुंबाने तक्रार केली. या तक्रारीवरून रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी फसवणूक, तसेच इतर कलमांन्वये विवाहितेसह तिला मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.