सिंहगडावर रविवारी पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे गडाच्या प्रसिद्ध असणाऱ्या भागांवर पर्यटकांची संख्या जास्त होती. पुणे जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाशेजारून कल्याण दरवाजाकडे जाणाऱ्या तटबंदीजवळील मधमाश्यांचे मोहोळ पर्यटकांनी दगड मारून उठवले. सकाळी साडेआठच्या सुमारास आणि त्यानंतर तासभराच्या अंतराने मोहोळ उठले. त्यामुळे पर्यटकांनी धावपळ सुरू झाली.
पर्यटकांच्या या उपद्रवामुळे तीन ते चार जणांना मधमाश्यांनी डंखही मारला असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. या वेळी पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गवत आणि ओल्या फांद्या पेटवून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. तर पर्यटकांनीही कल्याण दरवाजाने जाऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत होती. सुभेदार तानाजी मालुसरेंच्या समाधीस्थळाचे देखभालीसाठी असणारे सुमित रांजणे, दत्ता जोरकर, राहुल जोरकर, स्वप्नील सांबरे, पुरातत्व विभागाचे सागर शिंदे, घेरा सिंहगड वनसंरक्षण समितीचे सुरक्षा रक्षक नंदू जोरकर यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
घाटरस्त्यावर कोंडी
पायथ्यापासून गडाकडे जाणाऱ्या घाटरस्त्यावर रविवारी सकाळी अकरा वाजता वाहतूक कोंडी झाली. तीन दिवस घाटरस्ता बंद असून, रस्ता आणि पार्किंगबाबत ठोस उपाययोजना केल्या नसल्याने परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे चित्र आहे.