महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं फार मोठी गोष्ट नाही असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे राज्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
तिथेही ठाकरे आहेत. इथेही ठाकरे आहेत. दोघे भाऊ आहेत. हे नातं कायम आहे. काही राजकीय मतभेद झाले. त्यातून मार्ग वेगळे झाले असले तरी उद्धव ठाकरे यांचा मार्ग कायम महाराष्ट्र हिताचा राहिला आहे. राज ठाकरे यांचं विधान मी पण ऐकलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही ऐकलं. त्यांनी भूमिका मांडली. महाराष्ट्र हितासाठी जे काही वाद आहेत ते मिटवायला तयार आहोत. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, कोणताही वाद आणि भांडण नाही. असलं तर मिटवायला वेळ लागत नाही. फक्त भूमिका इतकीच आहे की, लोकसभा निवडणुकीवेळी, विधानसभेवेळी उद्धव ठाकरे हेच सांगत होते, या महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या फौजा आहेत. त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नये. २५ वर्ष आमची युती होती. त्यातला काही काळ राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यात सहभागी होते. पण महाराष्ट्राच्या मुळावरच घाव घालण्यासाठी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा आम्हाला बाजूला व्हावं लागलं. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकसभा, विधानसभेवेळी आमची भूमिका होती की, महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारे मदत होईल अशी भूमिका घेऊ नये. आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही, ते महाराष्ट्राला परवडणारं नाही. ही भूमिका आमची आजही आहे. उद्धव ठाकरे यांनी नम्रपणे सांगितलं आहे, आजही अशा शक्ती आहेत, ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात. मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्यामागून कारस्थानं सुरू आहेत. अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही. अशा माणसांना आम्ही घरातही घेणार नाही. अशी भूमिका घेणं सर्वांनी गरजेचं आहे. ही भूमिका कोणी घेत असेल तर त्यांचं स्वागत आहे. त्यानंतर आम्ही चर्चेला तयार आहोत, आम्ही आमची पुढची भूमिका मांडू असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.