Heavy rain in Pune: पुण्यात मान्सून पूर्व पावसाने दाणादाण उडवली; ढफुटी सदृश्य पावसात शहर जलमय

पुणे : स्मार्ट सिटी आणि मेट्रो डेव्हलपिंग सिटी अशी ओळख असलेल्या पुण्यात मान्सून पूर्व पावसाने दाणादाण उडवली आहे. ढफुटी सदृश्य पावसाला आज संध्याकाळी ४ वाजल्यापासून सुरुवात झाली. आणि अवघ्या दोन तासातच पुणे शहर जलमय झाले. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला. नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. पुणे महापालिका प्रशासन, अग्निशमन दल, महानगर प्रादेशिक विभाग, पोलीस ट्राफिक विभाग सगळे युद्ध पातळीवर काम करत आहे. शहरात पावसाच्या सरी अजून सुरूच आहे.

पुणे शहर तसेच उपनगर आणि पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पुणे शहरात लक्ष्मी रोड, अल्का चौक , सिंहगड रोड, पुणे स्टेशन येथील रस्त्याना नदीच स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. सिंहगड रोडवर भर पावसात कामावरून घरी परतणाऱ्या लोकांना तब्बल दीड ते दोन तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तर पर्वती, सहकार नगर, डेक्कन आणि काही भागातल्या वस्ती वाड्यात राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरले. यामुळे लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाच्या आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत नोंदवला गेलेला पाऊस

शिवाजीनगर: 101mm
इंदूपुर : 62.2mm
वडगावशेरी : 61.5mm
NDA : 45.5mm
हावेली : 19mm
मागपट्टा :14 mm
हडपसर: 11mm

रवींद्र धंगेकर यांनी केली पोस्ट

पाऊस झाला मोठा…. नालेसफाई घोटाळा झाला खोटा…. आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे.सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे.आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला आहे.पुढच्या ५० वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे.प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्या आहेत. पण पुणेकरांनो तुम्ही कुणाला जाब विचारायचा भानगडीत पडू नका,कारण “पाऊसच जास्त झाला” असे त्यांचे नेहमीचे उत्तर ठरलेले आहे. सुखरूप घरी पोहचा… काळजी घ्या…

सुप्रिया सुळेंचे ट्विट

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात झालेल्या या पावसानंतरच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. शहराच्या या दुर्दशेला शासनाला जबाबबार ठरवले. एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात की, पावसाच्या एकाच तडाख्यात पुण्याच्या रस्त्यावर पाणी तुंबले. महापालिकांमध्ये प्रशासक आहेत. त्यांनी जुनमध्ये पावसाची शक्यता ध्यानात धरुन नालेसफाई करण्याचे आदेश देणे गरजेचे होते. पुण्याचे रस्ते ना रस्ते आज तुंबले आहेत. नागरीकांच्या घरात पाणी घुसले. याला जबाबदार महापालिकेचा बेजबाबदार कारभार आहे. जनतेने आपले म्हणणे मांडायला जायचे तरी कुठं? गेली दोन वर्षांपासून शहरात लोकनियुक्त महापालिका देखील अस्तित्वात नाही. शहराच्या दुर्दशेला शासन जबाबदार आहे.