सांताक्रूझ येथे सोमवारी ३९.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. तर कुलाबा येथील पारा सोमवारी ३५ पार पोहोचला. कुलाबा येथे ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. कोकण विभागात सांताक्रूझ येथील तापमान सर्वाधिक नोंदले गेले. स्वयंचलित केंद्रांवरील नोंदीनुसार राम मंदिर येथे ४३, विक्रोळी येथे ४३.७, विद्याविहार येथे ४०.३, कोपरखैरणे येथे ४२.२, नवीन पनवेल येथे ४३.३ कमाल तापमानाची नोंद झाली. माटुंगा येथे ३७.६ तर महालक्ष्मी येथे ३६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. मुंबईने अनुभवलेल्या या दुसऱ्या उष्णतेच्या लाटेनंतर मुंबईसारख्या किनारपट्टीच्या शहरात उष्णतेच्या लाटेची वारंवारता आणि तीव्रता वाढत आहे का, याबद्दलही विचारणा होत आहे.
वाढत्या किमान तापमानाच्या पार्श्वभूमीवर रात्रीही आता तापमान दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी वर्तवला. राज्याला ३० एप्रिलपासून अवकाळी पावसाच्या वातावरणापासून दिलासा मिळू शकतो. मात्र दिवसाप्रमाणेच आता रात्रीही काहिली वाढण्याचा अंदाज आहे. हा परिणाम पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत अधिक जाणवले, असे ते म्हणाले. मध्य महाराष्ट्रात तयार झालेल्या दक्षिणोत्तर वारा खंडितता प्रणालीतून तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या द्रोणीय आसामुळे वाऱ्यावर परिणाम झाला आहे. यातून किमान तापमानात वाढ नोंदली जात आहे. सध्या कोकण विभागातही रात्रीच्या उकाड्याचा प्रभाव कायम राहून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही असह्य काहिली होईल, अशीही शक्यता त्यांनी वर्तवली. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रात चक्रीय वातविरोधी स्थितीमुळे वायव्येकडून उष्णता येत असून हवेचा उच्च दाब, स्थिरावलेला वारा यामुळे कोकणात उष्णतेची स्थिती कायम असल्याचे ते म्हणाले.
सर्वाधिक तापमान मालेगावमध्ये
राज्यात सर्वाधिक तापमान मालेगाव येथे ४४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. उर्वरित महाराष्ट्रात बहुतांश केंद्रांवर ४०च्या पुढे कमाल तापमानाचा पारा पोहोचला आहे. मात्र उर्वरित केंद्रांवरील सोमवारचे कमाल तापमान आणि सरासरी तापमान यात फारसा फरक नाही. सोमवारीही हा सर्वाधिक फरक सांताक्रूझमध्ये नोंदला गेला. लोहगाव केंद्रावर सोमवारचे कमाल तापमान आणि सरासरी कमाल तापमान यात ४.४ अंशांचा फरक होता. त्या खालोखाल पुणे केंद्रावर दोन्ही तापमानात ३.७ अंशांचा फरक नोंदला गेला. सध्या मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीपेक्षा मोठी वाढ झाल्याची नोंद होत आहे. लोहगाव येथे किमान तापमान सरासरीपेक्षा ५.४ अंशांनी अधिक होते. सांगली येथे ५.२ तर सातारा येथे ४.५, सोलापूर येथे ४.६ अंशांनी किमान तापमान सरासरीपेक्षा चढे होते. सोलापूर येथे सोमवारी किमान तापमानाचा पारा ३० अंशांच्या पुढे होता. ३०.२ अशी सोलापूरच्या किमान तापमानाची नोंद झाली.