Heat Stroke: यंदाचा उन्हाळा ठरला अतितापदायक! राज्यात उष्माघाताचे तब्बल ३३५ रुग्ण

प्रतिनिधी, पुणे : राज्यात यंदा उन्हाळ्यात उष्माघाताच्या ३३५ रुग्णांची नोंद झाली असून, एक रुग्ण दगावला आहे. सर्वाधिक ३६ रुग्ण नाशिक जिल्ह्यातील असून, लातूर, नंदूरबार या जिल्ह्यांत एकही रुग्ण आढळला नाही. एक मार्च ते १५ जून या कालावधीत भंडारा जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.

राज्यात गेल्या वर्षी उष्माघातामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उष्माघाताच्या बळींचे प्रमाण कमी झाले आहे. सांगली, रत्नागिरी, हिंगोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. मुंबई (तीन), वाशिम (तीन), पालघर (दोन), रायगड (दोन), जळगाव (पाच), बीड (दोन), नगर (तीन) आणि पुणे जिल्ह्यात आठ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात दर वर्षी मार्च ते जून या कालावधीत सर्वेक्षण करण्यात येते. रुग्णांचा मृत्यू उष्माघातामु‌ळेच झाला आहे, याची खात्री करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात येते. या समितीमार्फत उष्माघाताच्या बळींची चौकशी केली जाते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

उत्तर भारताची होरपळ! देशात चार महिन्यात उष्माघाताचे ११४ बळी, तर ४० हजारांहून अधिक बाधित
सर्वाधिक रुग्ण आढळलेले जिल्हे
नाशिक ३६
जालना २८
नागपूर २७
गडचिरोली २४
बुलढाणा २३
धुळे २०
सोलापूर १९