Gudi Padwa 2025 : नवीन संधी, नव्या स्वप्नांची पूर्ती आणि आनंदाची उधळण; राज्यभरात नववर्षाचा उत्साह, ठिकठिकाणी शोभायात्राचे आयोजन

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस. या दिवसांपासून मराठी नवीन वर्ष सुरु होतं. गुढीपाडवा म्हणजे हिंदू शास्त्रानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. हिंदू धर्मात गुढी पाडव्याला खूप महत्व आहे. राज्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने गिरगाव, ठाणे, डोंबिवली यांसह विविध परिसरात शोभायात्रा काढल्या जात आहेत. तसेच यानिमित्ताने महाराष्ट्रात सर्वत्र गुढी उभारुन, गोडाधोडाचे पदार्थ करुन नवीन वर्षाचा आनंद साजरा केला जात आहे. सध्या सर्वत्र चैतन्यमय वातावरण असते.

महाराष्ट्रातील पहिली गुढी तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर

नववर्षाची महाराष्ट्रातील पहिली गुढी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या कळसावर उभारण्यात आली आहे. विधिवत पूजा करत देवीच्या महंत, पुजाऱ्यांनी ही गुढी उभारली. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी आजचा एक शुभ मुहूर्त असल्याने आणि मराठी नवीन वर्षाची आज सुरुवात होत असल्याने देवीची शिवकालीन दागिने घालून अलंकार पूजा करण्यात आली. देवीची पहाटे 5 वाजता आरती करुन तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर विधीवत पूजा करुन गुढी उभारण्यात आली. तुळजापूर मंदिरावर गुढी उभारण्यात आल्यानंतर तुळजापूर शहरात नागरिक गुढी उभी करतात.

गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात मोठा उत्साह

गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मराठी नववर्षानिमित्त ठाण्यात शोभायात्रेला सुरुवात झाली आहे. श्री. कोपीनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी कौपिनेश्वर मंदिरातून स्वागतयात्रेला प्रारंभ झाल्यानंतर श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन पालखी मार्गस्थ होईल. या स्वागतयात्रेला जोड म्हणून ठाणे शहरात १२ उपयात्रा देखील निघणार आहेत.

श्री कौपीनेश्वर मंदिरात स्वागतयात्रेचा समारोप

मुख्य स्वागतयात्रेत ठाणे महापालिकेचा विशेष सहभाग असुन राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्ताने चित्ररथ असणार आहे. त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण, प्लास्टीक बंदी, अवयवदान जागृती, मतदान जागृती आदी ७० चित्ररथांसह पालखी जांभळी नाका-रंगो बापूजी चौक या मार्गाने दगडी शाळेकडे निघून याचे रुपांतर भव्य स्वागतयात्रेत होणार आहे. ही स्वागतयात्रा पुढे आराधना सिनेमा, हरी निवास चौक, गोखले रोड पर्यंत येईल, पुढे राममारुती मार्ग, पु.ना. गाडगीळ चौक, तलावपाळी मार्गे पुन्हा श्री कौपीनेश्वर मंदिरात स्वागतयात्रेचा समारोप होईल.

नागपूर नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा काढली जात आहे. नागपुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे. तात्या टोपे नगर ते लक्ष्मी नगर अशी भव्य शोभायात्रा निघणार आहे. तसेच यावेळी सामूहिक रामरक्षा पठण केले जाणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)