अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि उपायुक्त रोहिदास पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पाटील म्हणाले, की पालखीचे अगमन झाल्यानंतर बंद रस्त्यांची माहिती नागरिकांना ‘गुगल मॅप’वर दिसेल. त्यासाठी ‘गुगल’सोबत करार केला आहे. त्यामुळे बंद रस्त्याकडे जाण्याचा मार्ग ‘गुगल मॅप’ नागरिकांना दाखवणार नाही. रस्ते सुरू केल्यानंतर त्याची माहिती ‘गुगल मॅप’ला दिली जाईल. त्यानंतर रस्ते सुरू झाल्याचेही ‘गुगल मॅप’वर नागरिकांना दिसेल. नागरिकांना दर वर्षीप्रमाणे पालख्यांचे ‘लोकेशन’ कळणार आहे. त्याची लिंक पुणे पोलिसांच्या वेबसाइट, सोशल मीडिया हँडलवर दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना पालखी कुठे आहे ही माहिती मिळणार आहे.
तीन टप्प्यांत वाहतूक बंद
शहरात आज, रविवारी (दि. ३०) दोन्ही पालख्यांचे आगमन होणार आहे. त्यासाठी वाहतूक शाखेकडून तीन टप्प्यांनुसार वाहतूक बंदचे नियोजन केले आहे. त्यासाठी पहिल टप्पा संचेती हॉस्पिटलपर्यंत, त्यानंतर संचेती हॉस्पिटल ते टिळक चौक आणि टिळक चौक ते पालखी मुक्काम असा असेल. पहिल्या टप्प्यातील रस्ते अगोदर बंद केले जाणार आहेत. गर्दी वाढू लागल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील रस्ते बंद केले जातील. तिसऱ्या टप्प्यातील रस्ते बंद केल्यानंतर पहिल्या टप्प्यातील रस्ते खुले केले जातील. पालखी गेल्यानंतर तत्काळ रस्ते रिकामे करून वाहतूक सुरू केली जाणार आहे; तरीही नागरिकांनी शक्यतो वाहन घेऊन बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी केले.