धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कोण घेणार? गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं

आज पुन्हा एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आता या प्रकरणावर बोलताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे तिघं मिळून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतील असं गोगावले यांनी म्हटलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले गोगावले?

कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते, मर्यादा पार झाली की ती गोष्ट आपोआप घडते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघे बसून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतील असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सध्या महायुतीमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून तिढा आहे. नाशिकचं पालकमंत्रिपद हे गिरीश महाजन तर रायगडचं पालकमंत्रिपद हे आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. मात्र या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले हे इच्छूक होते. यावरून महायुतीमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली. रायगडच्या पालकमंत्रिपदावर भरत गोगावले यांनी दावा केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना दोन दिवसांत पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असं गोगावले यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देखील सुनावलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी एकाच वेळी सर्व मागण्या करू नयेत, शिंदे साहेबांनी दहा टक्के आरक्षण दिले, ते आरक्षण टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करत असून, कुणबी म्हणून दिलेले दाखले ही देणे सुरूच आहेत, असं गोगावले यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आता आपल्या नेत्यांच्या बैठका बोलावत आहेत, मात्र आता त्याचा काहीही उपयोग नाही, जेव्हा बोलावयच्या होत्या तेव्हा बोलावल्या नाहीत, असा टोलाही यावेळी गोगावले यांनी ठाकरेंना लगावला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)