Girish Mahajan : हिंदीच्या सक्तीला राज ठाकरेंचा विरोध, मंत्री गिरीश महाजन म्हणतात, ‘हिंदी भाषा ही…’

“राज्य सरकारचं आर्थिक नियोजन बिघडलय असं मला वाटत नाही. राज्याची आर्थिक स्थिती ही चांगली आहे. पीडब्ल्यूडी विभागाला निधी हा थोडा मागे पुढे झाला आहे. माझ्या खात्यासह अनेक खात्यांच योग्य नियोजन हे सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी मागचा सर्व बॅकलॉग आता भरून काढला आहे” असं मंत्री गिरीश महाजन राज्य सरकारच्या आर्थिक नियोजनावर म्हणाले. हिंदी भाषेच्या सक्तीला राज ठाकरेंचा विरोध आहे, त्यावर सुद्धा गिरीश महाजन बोलले. “हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, त्यामुळे हिंदी आपल्याला आलीच पाहिजे. मराठीची सक्ती आपण करतोच आहोत, या राज्यात जो राहील त्याला मराठी आलीच पाहिजे” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

“हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा आहे, त्यामुळे हिंदी भाषा आली पाहिजे या मताचा मी आहे. हिंदी भाषा ही वेगळी भाषा नाही, राज ठाकरे यांचे जे मत असेल ते असेल. ज्या देशात आपण राहतो, त्या देशाची राष्ट्रभाषा जी आहे ती हिंदी आहे. त्यामुळे प्रत्येकाला ती आली पाहिजे. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे, त्यासोबत हिंदी आली पाहिजे” असं गिरीश महाजन म्हणाले. “राज ठाकरे यांचं म्हणणं काय, ते मी ऐकले नाही. पण प्रत्येकाला हिंदी भाषा आली पाहिजे मी या मताचा आहे” असं गिरीश महाजन यांचं मत आहे.

‘उद्धव ठाकरे यांचा आता टीआरपी गेलेला आहे’

गिरीश महाजन यांनी, बाळासाहेब ठाकरे यांचं AI भाषण ऐकवणाऱ्या उद्धव ठाकरे गटावर बोचरी टीका केली. “अतिशय केविलवाणा प्रयोग हा ठाकरेंचा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा आता टीआरपी गेलेला आहे. त्यांच्यासोबत कोणी राहिलेलं नाही. पुढील आठवड्याभरात नाशिकमध्ये त्यांचे किती लोक राहतात हे तपासून बघा. काही नसताना आपण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यांचे विचार सगळे संपवले. उद्धव ठाकरे काय आणि उबाठा काय हे आता लोकांना कळालेलं आहे” अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

ते काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले

“कितीही बाळासाहेबांच्या आवाजात, कुठे काही आवाहन केलं किंवा उद्धव ठाकरेंनी तसा आवाज काढण्याचा प्रयत्न केला तरीही त्याने आता फरक पडणार नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. पण उद्धव ठाकरे यांनी ते आता सर्व संपवलेलं आहे. खुर्चीच्या हव्यासापाई ते काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले आणि त्यांनी त्यांचा पक्ष संपवला. भाषण ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे, त्याचं माननीय बाळासाहेबांनाही किती वाईट वाटत असेल. माझ्या मुलाने माझी काय थट्टा लावलेली आहे, हेच ते म्हणत असतील. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवाजात बोला” असं मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)