पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे यांनी १६ मे रोजी निवासस्थानी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याच्या घटनेनंतर जे वास्तव समोर आले आहे त्याने अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या प्रकरणात सासरे आणि दीराला अटक झाली आहे. या प्रकरणातील दुर्दैवी मुलीचे पालक अनिल कस्पटे कुटुंबियांशी मंत्री गिरीश महाजन यांनी आज फोनवरुन विचारपूस करीत त्यांना दिलासा दिला. या प्रकरणात पोलिसांनी काही हलगर्जीपणा केला असेल तर त्यांच्यावरही चौकशीअंती कारवाई होईल असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
गिरीश महाजन यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. वैष्णवीचा ज्या पद्धतीने छळ केला, 50 लाख दे नाहीतर भावांना मारून टाकू असं तिला धमकावण्यात आले होते. हे सर्व पुरोगामी महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. या संदर्भात आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले.राजेश कावेडिया यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी अशी केलेली मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचेही महाजन यांनी सांगितले.
या प्रकरणात मागचे सगळे गुन्हे पाहून पोलिसांनी हगवणे यांना ताकीद दिली होती.लहान मुलाला घेऊन गेलेला चव्हाण फरार आहे तो आज उद्या सापडेल. मुख्यमंत्र्यांशी कस्पटे यांचे बोलणं करून दिलेले आहे. कोणत्याही परिस्थित कोणीही यातून सुटणार नाही. दोषींवर अतिशय कडक कारवाई केली जाईल.पोलिसांवर जे आरोप झालेत त्याची चौकशी केली जाईल कोणालाही सोडलं जाणार नाही. मागचे सगळे गुन्हे पाहून पोलिसांकडून हगवणे यांना ताकीत देण्यात आली होती. त्यांचा हा धंदा होता ही विकृती आहे. यापुढचा तपास योग्य दिशेने सुरु आहे.