Ghatkopar Hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: २४ तास झाले तरी बचाव कार्य संपले नाही, NDRFसमोर सर्वात मोठे आव्हान

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगराला काल सोमवारी वादळी वारा आणि अवकाळी पावसाने झोडपले. यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना देखील घडल्या. घाटकोपर येथे एका पेट्रोल पंपवर मोठे होर्डिंग कोसळल्याने १४ लोकांचा मृत्यू झाला तर ७५ हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेला आता २४ तास उलटले आहेत तरी मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरूच आहे. एनडीआरएफचे पथक काम थांबलेले नाही.

घाटकोपर येथील बचाव कार्याची माहिती देताना NDRFचे सहाय्यक अधिकारी निखिल मुधोळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी गॅस कटरचा वापर करता येत नाही कारण पेट्रोल पंप आहे. येथे गॅसोलीनचा वापर करणाऱ्या कटरचा उपयोग करता येत नाही.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोसळलेल्या बोर्डाच्या खालून आतापर्यंत ८९ जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी १४ जणांचा मृत्यू झालाय तर ७५ जण जखमी आहेत. या सर्व जखमींवर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील विविध सहा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


या घटनेतील ७५ जखमींपैकी ३२ लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात ३५ , ४ जणांना लो.टिळक, तिघांना जोगेश्वरीच्या एचबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

मदत आणि बचाव पथकात १२५ कर्मचारी दोन जेसीबी, दोन गॅस कटर आणि २५ रुग्णवाहिका आणइ दोन हेव्ही ड्यूटी क्रेन आणि दोन हाइड्रा क्रेन आहेत. याच बरोबर मुंबई महानगल पालिकेचे ७५ आणि MMRDAचे ५० कर्मचारी आहेत.