नेमके काय झाले हे लक्षात येत नव्हते. पावसाची रिपरिप, चिखल आणि आक्रोश, किंकाळ्या. ढिगाऱ्याखालून येणारे काही आवाज. विजय आणि त्यांच्या मित्रांनी आवाज येणाऱ्या जागेच्या आतमध्ये शिरण्याचा मार्ग शोधायला सुरवात केली. ‘पेट्रोल पंप आहे. आग लागेल. थोडे थांबा, धीराने घ्या…’ अशा अनेक सूचना येत होत्या. विजय म्हणाले, ‘मी गॅरेजचे काम करतो. हा परिसर माझ्या परिचयाचा आहे. पेट्रोल पंपाला इंधन पुरवठा करणाऱ्या जोडण्यांचाही थोडा अंदाज होता. लोखंडी ढिगाऱ्याखालील माणसांना बाहेर लवकर काढायला हवे; जे कुणी मदतीला येतील, त्यांना घेऊन पुढे जायला हवे, या विचाराने ते पुढे सरसावले. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र रोहित कशागासर, विनोद जगताप, रितिक समशेर, अरुण शेठी, अजय शिवाजी साळुंके हेसुद्धा ढिगाऱ्याखाली शिरले.
वाट काढत ढिगाऱ्याखाली शिरल्यानंतरचे दृश्य भयावह होते. रिक्षा वाकल्या होत्या, गाड्या चेपल्या होत्या. काही माणसांचे हात तर काहींचे पाय गाडीतून बाहेर आलेले दिसत होते. श्वास घेण्यासही त्रास होत होता. विजय आणि त्यांच्या मित्रांनी त्याच होर्डिंगचे लोखंडाचे तुकडे हातात घेऊन गाड्यांच्या पत्र्यावर ठोकण्यास सुरुवात केली. गाडीतील कुणी प्रतिसाद देईल, याचा अंदाज ते घेत होते. काही जणांनी प्रतिसाद दिला. धीर देत या देवदूतांनी त्यांना बाहेर काढले. या दुर्घटनेत काहींच्या हाताला मार लागला होता, काहींचा पाय दुखापतग्रस्त झाला होता. जागीच गतप्राण झालेल्यांचे चेहरेही ओळखू येत नव्हते. ते दृश्य पाहून या बचाववीरांना स्वतःच्याच हृदयाची धडधड ऐकू येऊ लागली; पण त्यांनी हिंमत हरली नाही. जितक्या जणांपर्यंत पोहोचणे शक्य आहे, त्यांचा बचाव करायचा, या हिंमतीने त्यांनी तग धरला व त्यामुळेच या अपघातग्रस्तांचे प्राण वाचले.