मुंबईकरांचे ‘मेगा’हाल, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर, मध्य आणि पश्चिम अशा तिन्हीही रेल्वे मार्गावर आज (२७ एप्रिल) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. यादरम्यान अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा आज मेगाखोळंबा होणार आहे.

मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे आज रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक नियमित फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व उपनगरीय सेवा काही मिनिटे उशिराने असतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी शक्यतो पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मध्य रेल्वेचे वेळापत्रक काय?

मुंबई उपनगरीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ५व्या, ६व्या मार्गावर सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत डाऊन मेल / एक्स्प्रेस विद्याविहार स्थानकात येथे डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील. तर ठाणे स्थानकात पाचव्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. अप मेल-एक्स्प्रेस ठाणे स्थानकात अप जलदमार्गावर वळविल्या जातील आणि विद्याविहारजवळ सहाव्या मार्गावर पुन्हा वळविल्या जातील.

या ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. या ब्लॉक काळात ११००५५, ११०६१ आणि १६३४५ या गाड्या सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे. तसेच ११०१०, १२१२४, १३२०१, १७२२१, १२१२६, १२१४० आणि २२२२६ ठाणे आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गाऐवजी अप जलद मार्गावरून धावतील. या गाड्यांनाही सुमारे १० ते १५ मिनिटांचा उशीर होण्याची शक्यता आहे. या ब्लॉकमुळे ठाणे आणि डोंबिवली/बदलापूरहून मुंबईकडे येणाऱ्या उपनगरीय गाड्या ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून सुटतील.

हार्बर रेल्वेचे वेळापत्रक काय?

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि चुनाभट्टी-वांद्रे स्थानकां दरम्यान अप मार्गावर ११ वाजल्यापासून ते ४.१० वाजेपर्यंत आणि डाऊन हार्बर मार्गावर ११.४० वाजल्यापासून ते ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटी मुंबईहून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणारी डाऊन हार्बर लाईन सेवा सकाळी ११:१६ ते सायंकाळी ४:४७ पर्यंत बंद राहील. तर सीएसएमटी मुंबईहून वांद्रे/गोरेगावच्या दिशेने जाणारी डाउन हार्बर लाईन सेवा सकाळी १०:४८ ते सायंकाळी ४:४३ पर्यंत स्थगित राहील. तसेच पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटी मुंबईकडे येणारी अप हार्बर लाईन सेवा सकाळी ९:५३ ते दुपारी ३:२० पर्यंत बंद असेल. त्यासोबतच गोरेगाव/वांद्रेहून सीएसएमटी मुंबईकडे येणारी अप हार्बर लाईन सेवा सकाळी १०:४५ ते सायंकाळी ५:१३ पर्यंत रद्द राहील.

या ब्लॉकदरम्यान कुर्ला आणि पनवेल दरम्यान २० मिनिटांचा विशेष मेगाब्लॉक चालवला जाईल. सायंकाळी ६:०० नंतर सीएसएमटी मुंबई आणि गोरेगाव/वांद्रे दरम्यान हार्बर लाईन सेवा पूर्ववत सुरू होईल.

पश्चिम रेल्वेकडून मेगाब्लॉक नाही

पश्चिम रेल्वेने आजच्या मेगाब्लॉक संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मात्र कांदिवली आणि बोरिवली स्थानकादरम्यान रिगर्डिंगचे काम सुरु आहे. त्यामुळे काही गाड्यांवर आणि वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)