GBS आजाराचं थैमान सुरूच, पुण्यात 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर; ‘या’ भागात सर्वाधिक रुग्ण

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे (GBS) या दुर्मिळ आजारांच्या रुग्णात वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आता पुण्यात GBS या आजाराचे तब्बल 74 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांपैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रोगाचा उपचार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. यासाठी 15 आयसीयू बेड आरक्षित करण्यात आले आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात GBS आजारावर मोफत उपचार केले जाणार आहेत. सध्या GBS या आजाराचे पुण्यात 74 रुग्ण आहेत. त्यापैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर पाच रुग्णांना आज डिस्चार्ज दिला जाणार आहे. GBS रुग्णांसाठी 50 बेड तर 15 आय सी यू बेड हे कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत. पुणे महापालिका आयुक्त सर्व आरोग्य विभागाची थोडा वेळात बैठक घेणार आहेत.

ज्या खाजगी रुग्णालयात GBS चे रुग्ण आहेत. त्या ठिकाणी महापालिकेचे मेडिकल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यासोबतच नवले हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ रुग्णालय या ठिकाणी खाजगी दवाखाने रुग्णांची बिल किती घेतात, यावर ही ऑफिसरकडून लक्ष ठेवण्यात येणार आहेत. पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेडगाव, किरकटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्या ठिकाणी महापालिका शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार आहे.

घाबरून जाऊ नका – अजित पवारांचा सल्ला

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतंच या GBS आजाराबद्दल भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “आयुक्तांनी कमला नेहरू हॉस्पिटलला रुग्णांची व्यवस्था केलेली आहे. पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आपण वायसीएमला ही सगळी व्यवस्था केलेली आहे. जसा करोनाच्या काळामधील संकट आपण वेळीच ओळखून उपाययोजना केलेल्या होत्या, तसं हेही एक आजाराचं संकट आपल्यावर आल आहे. रुग्णांची वाढ होत आहे. पण घाबरून जाऊ नका त्या संदर्भामध्ये संपूर्णपणे माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे सर्व गोष्टींवर आरोग्यमंत्र्यांइतकेच बारकाईने लक्ष आहे. अधिकाऱ्यांना तसेच डॉक्टरांना पण योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत”, असे अजित पवार म्हणाले.

रुग्णांना मोफत उपचार देण्याचा निर्णय

“या आजाराचे मोठे बिल होत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम हॉस्पिटलमध्ये या रुग्णांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. तर पुणे शहरातील कमला नेहरू हॉस्पिटलला देखील मोफत उपचार देणार आहोत. काही ठिकाणी औषध महाग देत आहेत, नागरिकांचा आरोग्य चांगलं ठेवणं ही राज्य सरकारची देखील जबाबदारी आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या पेशंटसाठी ससूनमध्ये देखील मोफत उपचार सुरू करण्याचा निर्णय उद्या मुंबई गेल्यावर चर्चा करून घेणार आहे”, असेही अजित पवार म्हणाले.

प्रतिकार क्षमता कमी झाल्यावर GBS ची लागण

“प्रजासत्ताक दिनाला या उत्सवात सर्वांना खूप खूप शुभेच्छा. GBS रुग्णांची संख्या पुण्यामध्ये वाढलेली आहे. त्यामध्ये पाण्याचा इन्फेक्शन ही बाब निदर्शनास आली आहे. आरोग्य विभागातर्फे योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या उपाययोजना लवकरच होतील. सध्या हा आजार महात्मा फुले योजनेतंर्गत समाविष्ट करण्यात आला आहे. जर दवाखाने अनावश्यक बिल घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. प्रतिकार क्षमता कमी झाली की जीबीएस होत असल्याचे निदर्शनास आले आहे”, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)