सांगलीत भयंकर घटना, गुंगीचं ड्रिंक पाजून भावी डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार, तिघांना अटक

सांगलीत भयंकर घटना घडली आहे. भावी डॉक्टर तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार केला. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.

(फोटो)

स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगलीत महाराष्ट्राला कामिळा फासणारी घटना घडली आहे. सांगली शहरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या भावी डॉक्टर तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार केला. मंगळवारी रात्री वानलेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या खोलीत ही घटना घडली. याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने हालचाली करत तीन तरुणांना अटक केली आहे. यातील दोघे पीडित तरुणीच्या कॉलेजमध्येच शिकत असून तिसरा संशयित तरुण त्यांचा मित्र आहे.

चित्रपट पाहायला जाऊ असे सांगितले अन्…
विनय विश्वेष पाटील (यय २२, रा. महीपती निवास अंतरोळीकर नगर भाग १ सोलापुर शहर), सर्वज्ञ संतोष गायकवाड (वय२०, रा. एफ ६०५, सरगम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे), तन्मय सुकुमार पेडणेकर (वय २१, रा. ३०३ कासाली व्हिया अभयनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पीडित तरुणी आणि संशयित पाटील, गायकवाड सांगलीतील एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहेत. पीडित तरुणी तिसऱ्या वर्षात शिकत आहेत. मंगळवारी रात्री या तिघांनी तिला चित्रपट पाहायला जाऊ असे सांगून मोपेडवरून वानलेसवाडी येथील खोलीवर नेले.

गुंगीकारक ड्रिंक पाजले आणि
रुमवर गेल्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजले तसेच तेही दारू प्यायले. त्यानंतर तरुणी नशेत असताना तिघांनी तिच्यावर अत्याचार केले. काही वेळाने तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने तेथून स्वतःची सुटका करून घेतली त्यानंतर मध्यरात्री थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची तक्रार ऐकून गुन्हा नोंद करून तातडीने संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसांनी संशयितांना केली अटक
विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासात तीनही संशयितांना अटक केली.विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा नरळे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांकडून या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

नारायण परब

लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
आणखी वाचा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)