ज्याच्यासाठी ठाकरेंनी घेतला पंज्याशी पंगा, तोच नेता साथ सोडणार? शिंदे, अजित पवारांशी चर्चा

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी जिल्ह्यात लक्षवेधी घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानीपत झाल्यानं विरोधी पक्षांमधील नेते सत्ताधारी पक्षांची वाट धरु लागले आहेत.

सांगली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी जिल्ह्यात लक्षवेधी घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानीपत झाल्यानं विरोधी पक्षांमधील नेते सत्ताधारी पक्षांची वाट धरु लागले आहेत. जिल्ह्यात आधीच कमकुवत असलेल्या ठाकरेसेनेची अवस्था आणखी बिकट झाली आहे. जिल्हाप्रमुख संजय विभूते, युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. यानंतर आता ठाकरेसेनेला जिल्ह्यात आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

ठाकरेंच्या पैलवानानं शिवबंधन तोडण्याचे संकेत दिले आहेत. डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या संपर्कात आहेत. दोघांपैकी ज्यांना आपले मुद्दे पटतील, त्यांच्यासोबत जाऊ असं पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळे ठाकरेसेनेला सांगलीत लवकरच आणख एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कडाक्याच्या उन्हात ‘सावली’ दिसली अन् लेकीची कार थांबली; शरद पवार, सुळेंची ‘ती’ भेट चर्चेत
लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. पण कोल्हापूरची जागा ठाकरेसेनेनं काँग्रेसला सोडली असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक मतदारसंघ काँग्रेसला देण्यास ठाकरेंनी नकार दिला. त्यामुळे वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील अपक्ष लढले. त्यांनी बंडखोरी करत सांगलीची जागा जिंकली. महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले चंद्रहार पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांचा दारुण पराभव झाला.

लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या काही दिवस आधी पक्षात आलेल्या चंद्रहार पाटलांसाठी ठाकरेंनी ताकद लावली होती. त्यासाठी त्यांनी काँग्रेसचा दबाव झुगारला. पाटलांसाठी ठाकरेंनी सभा घेतली होती. मात्र तरीही पाटील पराभूत झाले. आता विशाल पाटील यांनी भाजपशी सलगी केली आहे. तर चंद्रहार पाटील यांनी थेट दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांशी चर्चा केल्याचं समजतं. ते लवकरच पक्षांतर करण्याची शक्यता आहे. तशा चर्चा सांगलीत सुरु आहेत.
रोहित पवारांना दे धक्का, कर्जतमध्ये शिंदेंची सत्ता; भाजपकडून ऑपरेशन, १२ पैकी ८ नगरसेवक फुटले
लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटील यांच्यासाठी काँग्रेसशी पंगा घेतला. पण आता हेच पाटील एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले असून ते अजित पवारांच्याही संपर्कात आहेत. त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांशी चर्चा केली आहे. पक्षप्रवेशाचे मुद्दे त्यांना सांगितले आहेत. भविष्यातील संधी, क्रीडा क्षेत्राचा विकास या मुद्द्यांचा त्यात समावेश आहे. ते महिन्याभरात पक्षांतराचा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.आणखी वाचा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)