गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, टोळीयुद्धाची देखील अनेक प्रकरणं समोर आली आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, हे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. या सर्व मुद्द्यावर आज अजित पवार यांनी भाष्य केलं आहे, ते बीडमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
काही चुकीच्या लोकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि नको तेवढी मोकळीक दिल्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला आहे. मात्र आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला लौकिक मिळून द्यायचा आहे. बीडमधील विकृत लोकांना सरळ करणार म्हणजे करणार. कोणी कितीही मोठ्या बापाचा असो किंवा कोणत्याही नेत्या जवळचा असो त्याला सरळ करणार म्हणजे करणार. नवीन पिढीला आवाहन करतो की आईच्या पोटातून कोणी शिकून येत नाही, पण जिद्द आणि चिकाटीच्या बळावर माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो हे आजच्या लोकांकडून कळतं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी प्रसारमाध्यांचे देखील कान टोचले आहेत. वस्तूस्थितीला धरून बातम्या दिल्या पाहिजेत, टी आर पी साठी कधी कधी बातम्या रंगवून सांगितल्या जातात, मात्र तसे करू नका. त्यामुळे एखाद्या शहराची बदनामी होऊ नये. बीड आणि बिडकरांची बदनामी थांबवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. चुकीच्या गोष्टीला समर्थन न करता सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे.
ग्रामीण मराठी पत्रकारितेला एक विशेष परंपरा आहे. विविध लढ्यात पत्रकारितेचे मोठे योगदान आहे. ते टिकवले पाहिजे. मीडियाने वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगले म्हटलं पाहिजे. मीडिया ट्रायलमुळे एखादा माणूस आयुष्यातून उध्वस्त होतो. AI चा वापर पत्रकारितेलाही केला पाहिजे. आता ते सगळ्या क्षेत्रात वापरले जाणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे, दरम्यान बीड जिल्ह्यात शहरापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर विमानतळ उभारणार असं अश्वासन देखीलअजित पवार यांनी यावेळी दिलं आहे.